Video : बिर्याणीसोबत दही मागितल्यावर कर्मचाऱ्यांनी केली हत्या; पोलिसांसमोरच केली मारहाण

Hyderabadi biryani : हैदराबादमध्ये बिर्यानीसोबत दही मागितले म्हणून एकाची हत्या केल्याचा धक्कादायक घटना रविवारी घडली आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्ह्याची नोंद करुन तपास सुरु केला आहे. दही मागितल्याने हत्या केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

आकाश नेटके | Updated: Sep 11, 2023, 04:27 PM IST
Video : बिर्याणीसोबत दही मागितल्यावर कर्मचाऱ्यांनी केली हत्या; पोलिसांसमोरच केली मारहाण title=

Crime News : हैदराबादची बिर्याणी (Hyderabad biryani) ही जगभरात प्रसिद्ध आहे. अनेकजण तशीच चव चाखायला मिळावी म्हणून हैदराबाद (Hyderabad Crime) पर्यंतही जातात. मात्र या बिर्याणीमुळेच एका व्यक्तीची हत्या झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या बिर्याणीसोबत मागवलेल्या कोशिंबीरमुळे एका व्यक्तीला आपला जीव गमवावा लागला आहे. हॉटेलमध्ये बिर्याणी खाणाऱ्या एका व्यक्तीने दही मागितले होते. यावरून त्याचा हॉटेलच्या कर्मचाऱ्यांशी वाद झाला. हा वाद इतका वाढला की कर्मचाऱ्यांनी त्या व्यक्तीला बेदम मारहाण केली. या सगळ्या प्रकारानंतर मारहाण झालेला ग्राहक पोलीस ठाण्यात (Hyderabad Police) तक्रार दाखल करण्यासाठी गेला होता. मात्र तिथेच तो कोसळला आणि गतप्राण झाला.

हैदराबादमधील पुंजागुट्टा भागातील प्रसिद्ध मेरिडियन बिर्याणी रेस्टॉरंटमध्ये हा सगळा धक्कादायक प्रकार घडला आहे. ग्राहकाने वारंवार दही देण्याची मागणी केल्याने रेस्टॉरंटच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना बेदम मारहाण केली. लियाकत असे मृत्यू झालेल्या ग्राहकाचे नाव असून तो चंद्रलोक भागातील रहिवासी होता. लियाकत हा विवाहित असून त्याला मुलेही होती. त्याच्या या धक्कादायक निधनामुळे कुटुंबियावर शोककळा पसरली आहे.

रविवारी रात्री मेरिडियन रेस्टॉरंटमध्ये लियाकत बिर्याणी खात होता. रेस्टॉरंटमध्ये बिर्याणीची ऑर्डर दिली होती. मात्र बिर्याणी आली तेव्हा सोबत दही नव्हते. त्याने दही मागितले असता हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी त्याला नकार दिला. तो पुन्हा पुन्हा दही मागत राहिला. यामुळे रेस्टॉरंटचे कर्मचारी आणि मालक संतप्त झाले आणि त्यांनी लियाकतशी वाद घालण्यास सुरुवात केली.

यानंतर रेस्टॉरंटचे कर्मचारी आणि मालकाने लियाकतला आत नेले आणि खोलीला आतून लावून मारहाण करण्यास सुरुवात केली. या सगळ्या प्रकाराची माहिती पोलिसांना दिली. मात्र पोलिसांच्या समोरसुद्धा रेस्टॉरंटच्या कर्मचाऱ्यांनी लियाकता मारणं सुरुच ठेवलं. त्यानंतर पोलिसांनी हस्तक्षेप करत लियाकतला सोडवलं आणि तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात आणलं.  मात्र पोलीस ठाण्यात आणताच लियाकत खाली कोसळला. त्यामुळे पोलिसांनी त्याला रुग्णालयात दाखल केले. तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी लियाकतला मृत घोषित केले.

दरम्यान, पोलिसांनी गुन्हा नोंदवून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. तसेच रेस्टॉरंटमध्ये लावलेले सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज ताब्यात घेतले आहे. पोलीस आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजही तपासत आहेत. दुसरीकडे या हॉटेलच्या कर्मचार्‍यांनी ग्राहकांना अनेकदा मारहाण केल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.