Crime News : सध्याच्या धावपळीच्या जगात एकमेकांना मदत करण्यासाठी मदत करणारी माणसं क्वचितच सापडतात. अपघातासारख्या घटनांवेळी अशी माणसं पुढे येऊन मदत करतात. पण यामध्ये काही लोक अशीही असतात की, अशावेळी स्वतःच्या स्वार्थाचा विचार करतात. असाच काहीसा प्रकार दिल्लीत (Delhi Crime) घडलाय. अपघातानंतर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या तरुणाला मदत करण्याऐवजी त्याच्या वस्तू घेऊन लोकांनी पळ काढला आहे. यासगळ्या प्रकारानंतर माणुसकी किती जिवंत आहे याचं ताजं उदाहरण समोर आलं आहे.
दक्षिण दिल्लीतील पंचशील पार्क मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या अपघातात गंभीर जखमी झाल्यानंतर तीन दिवसांनी मंगळवारी पियुष पाल नावाच्या 30 वर्षीय फ्रीलान्स फोटोग्राफरचा मृत्यू झाला. पोलीस अधिकाऱ्यांनी बुधवारी या प्रकरणाची माहिती दिली. अपघातानंतर तो रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. त्याचा लॅपटॉप, कॅमेरा आणि इतर मौल्यवान वस्तू चोरीला गेल्याचा आरोप मृत पियुष पालच्या मित्रांनी केला आहे. मात्र, पोलिसांनी याबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास गुरुग्राममध्ये फ्रीलान्स फोटोग्राफर म्हणून काम करणाऱ्या पियुष पाल याच्या बाईकची बदरपूर येथील रहिवासी 26 वर्षीय बंटी कुमार चालवत असलेल्या दुसऱ्या दुचाकीला धडक बसली. बंटी गुरुग्राममध्ये खासगी ड्रायव्हर म्हणून काम करतो. पोलिसांना रात्री 10.11 वाजता या अपघाताच्या घटनेचा फोन आला होता.
त्यानंतर पोलिसांचे एक पथक घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर पोलिसांनी दोघांनाही रुग्णालयात हलवलं. मात्र घटनास्थळी पोलिसांना त्या दोघांव्यतिरिक्त कोणीच आढळलं नाही. एका जखमीला पीएसआरआय रुग्णालयात तर दुसऱ्याला एम्सच्या ट्रॉमा सेंटरमध्ये हलवण्यात आले. सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यामध्ये पाल याच्या बाईकची बंटी कुमारच्या गाडीला धडक बसल्याचे दिसले. त्यानंतर सोमवारी बंटी कुमार यांच्या जबाबाच्या आधारे भारतीय दंड संहितेच्या कलम 279 आणि 337 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र मंगळावरी
संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास पालचा मृत्यू झाला. बुधवारी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
दरम्यान, अपघातानंतर तिथे असलेल्या लोकांनी पियुषचा लॅपटॉप, कॅमेरा आणि मोबाइल फोन चोरल्याचा दावा त्याच्या मित्रांनी केला आहे. पियुषची सहकारी ईशानी दत्ताने सांगितले की, पोलिसांना कळवण्याऐवजी किंवा पियुषला रुग्णालयात नेण्याऐवजी लोक त्यांच्या फोनने रस्त्यावर जखमींचे फोटो आणि व्हिडिओ काढण्यात व्यस्त होते. पियुषचा यांच्या एका ज्येष्ठ पत्रकार मित्राने सांगितले की, 'एका व्यक्तीने तर पाल याचा लॅपटॉप, पर्स आणि मोबाईल चोरला आणि अनेकांनी फोटो आणि सेल्फी काढले.'