Amazon Manager Shot Dead: ईशान्य दिल्लीमध्ये अज्ञात व्यक्तींनी बाईकवरुन जाणाऱ्या 2 व्यक्तींवर गोळीबार केल्याची घटना घडली आहे. बाईकवरुन जाणाऱ्या मामा, भाच्यावर केलेल्या हल्ल्याच भाच्याचा मृत्यू झाला आहे. गोळीबार केल्यानंतर हल्लोखोर घटनास्थळावरुन फरार झाले आहेत. अगदी जवळून डोक्यात गोळी लागल्याने भाच्याचा जागीच मृत्यू झाला तर मामा गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. रुग्णालयामध्ये सध्या जखमी व्यक्तीवर उपचार सुरु आहेत.
एका व्यक्तीची गोळी झाडून हत्या केल्याची ही घटना भजनपुरा परिसरामधील सुभाष विहार येथे घडला. या ठिकाणी राहणाऱ्या हरप्रीत सिंह (36) हे त्यांचे मामा गोविंद यांच्याबरोबर मंगळवारी बाइकवरुन जात असतानाच हा हल्ला झाला. हरप्रीत बाईक चालवत असतानाच 5 जणांनी त्यांची बाईक मध्येच अडवली. हरप्रीतने बाईक थांबवताच या अज्ञात व्यक्तींनी दोघांवर गोळीबार केला. हरप्रीतला अगदी पॉइण्ट ब्लँकवरुन गोळी मारण्यात आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. गोविंद हे गंभीर जखमी झाले आहेत.
घटनास्थळी असलेल्या लोकांनी तातडीने पोलिसांना यासंदर्भात माहिती दिली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले. रुग्णवाहिकेने गोविंद यांना जग प्रवेश चंद्र रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. प्रकृती चिंताजनक असल्याने डॉक्टरांनी गोविंद यांना दिलशान गार्डन येथील गुरुतेग बहादुर रुग्णालयामध्ये हलवलं. सध्या इथेच त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या जबाबानुसार, 5 जणांनी हा हल्ला केला. पोलिसांनी या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे. या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरु करण्यात आली असून या माध्यमातून हल्लेखोरांबद्दल काही महिती मिळते का याचा शोध घेतला जात आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मरण पावलेला हरप्रीत ई-कॉमर्स वेबसाईट अॅमेझॉनमध्ये मॅनेजर पदावर कार्यरत होता.
#WATCH | Delhi | A 36-year-old man - Harpreet Gill - shot dead in Subhash Vihar, Bhajanpura and another man injured and admitted to a hospital after five youths on two-wheelers opened unprovoked firing at them before fleeing the spot. CCTV footage in the area are being scanned.… pic.twitter.com/EzuzvqX6at
— ANI (@ANI) August 30, 2023
सोमवारीही दिल्लीतील दरियागंजमध्ये अज्ञात व्यक्तींनी 30 वर्षीय व्यक्तीवर चाकू हल्ला करुन त्याची हत्या केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मरण पावलेल्या व्यक्तीचं नाव फुरकान असं आहे. एका वरिष्ट पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सायंकाळी 7 वाजून 50 मिनिटांनी पीसीआरला कॉल आला. ज्यामध्ये एका व्यक्तीवर चाकूने हल्ला केल्याची माहिती देण्यात आली. त्यानंतर पोलिसांची एक टीम घटनास्थळी पोहोचली. दरियागंजमधील जटवाडा येथील वस्तीत एका रुममध्ये एक व्यक्ती रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचं आढळून आलं. या व्यक्तीवर चाकूने वार करण्यात आळे होते. तपासामध्ये फुरकान नावाची ही व्यक्ती भाड्याच्या घरात राहत होती. रविवारी रात्री काही लोक त्याला भेटायला आल्याची माहिती पोलिसांना मिळाली असून त्याच दृष्टीने तपास सुरु आहे.