निर्मला सीतारमन यांच्या भेटीनंतर भावूक शशी थरुर म्हणतात....

त्यांची भेट घेण्यासाठी सीतारमन थेट रुग्णालयात पोहोचल्या 

Updated: Apr 16, 2019, 03:36 PM IST
निर्मला सीतारमन यांच्या भेटीनंतर भावूक शशी थरुर म्हणतात....  title=
छाया सौजन्य- ट्विटर

तिरुवअनंतपूरम : सोमवारी मल्याळम नववर्षाच्या निमित्ताने केरळच्या तिरुवअनंतपूरम येथील गांधारी अम्मन मंदिरात तुलाभरमसाठी काँग्रेस नेते शशी थरूर उपस्थित राहिले होते. त्याचवेळी 'तुलाभरम' म्हणजेच तुला करतेवेळी घडलल्या एका दुर्घटनेत थरुर यांच्या डोक्याला मार लागला, ज्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सोशल मीडियावर शशी थरुर यांनी रुग्णालयातील फोटोही पोस्ट केले ज्यामध्ये त्यांच्या डोक्याला फार दुखापत झाल्याचं पाहायला मिळालं. 

रुग्णालयात दाखल केलेल्या थरुर यांच्या समर्थकांमध्येही या दुर्घटनेनंतर चिंतेचं वातावरण पाहायला मिळालं. या साऱ्यामध्ये सुरक्षा मंत्री निर्मला सीतारमन यासुद्धा थरुर यांच्या भेटीला गेल्या. निवडणुकांच्या प्रचाराची धामधुम सुरू असताना व्यग्र वेळापत्रकातूनही सीतारमन यांनी थरुर यांची थेट रुग्णालयात जाऊन भेट घेतली. जे पाहून खुद्द थरूरही भावूक झाले. 

सोशल मीडियावर त्यांनी या भेटीला फोटो पोस्ट करत त्यासोबतच्या कॅप्शनमध्येही त्यांनी या भेटीविषयीच्या भावना व्यक्त केल्या. सीतारमन यांच्या या वागण्याने माझं मन भरुन आलं. निवडणूक प्रचाराच्या या व्यग्र वेळापत्रकातही त्यांनी आज सकाळी माझी भेट घेतली. भारतीय राजकारणात अशा प्रकारचं दाक्षिण्य पाहायला मिळणं ही अत्यंत दुर्मिळ बाब आहे', असं त्यांनी लिहिलं. 

तिरुवअनंतपूरम येथील एका मंदिरा झालेल्या या दुर्घटनेमध्ये थरुर यांच्या पाहायालही दुखापत झाल्याचं कळत आहे. त्यामुळे आता ऐन प्रचाराच्याच दिवसांमध्ये समोर आलेली ही अडचण दूर करण्यासाठी आणि पुन्हा प्रचारासाठी स्थानिकांमध्ये येण्यासाठी थरुर कोणती युक्ती लढवतात हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे. शशी थरुर तिरुवअनंतपूरम येथील मतदार संघातून काँग्रेसच्या वतीने यंदाच्या लोकसभा निवडणुकीत उभे राहिले आहेत. यापूर्वी दोनदा ते या मतदार संघातून निवडून आले आहेत. त्यामुळे आता तिसऱ्यांदाही ते विजयी पताका उंचावत मतदारांच्या मनात असणारं त्यांचं स्थान कायम राखण्यात यशस्वी होणार का याकडेच राजकीय वर्तुळातील अनेकांचं लक्ष लागलं आहे.