RSS Statement on ideology: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे (Dattatreya Hosabale) यांनी संघ उजव्या विचारसणीचाही नाही आणि डाव्या विचारसणीचाही नाही (Dattatreya Hosabale on ideology of RSS) असं म्हटलं आहे. संघ केवळ राष्ट्रवादी विचारसणीचा आहे, असं होसबाळे यांनी म्हटलं आहे. होसबाळे यांनी राजस्थानमधील बिर्ला सभागृहामध्ये बुधवारी 'एकात्म मानवदर्शन अनुसंधान आणि विकास प्रतिष्ठान'ने आयोजित केलेल्या दीनदयाल स्मृती व्याख्यानमालेमध्ये 'राष्ट्रीय स्वयंसेवक संघ : काल, आज आणि उद्या' या विषयावर बोलत होते.
"भारतात राहाणारे सर्वजण हिंदू आहेत कारण त्यांचे पूर्वज हिंदू होते. त्यांच्या पूजेच्या पद्धती वेगवेगळ्या असू शकतात मात्र सर्वांचा डीएनए सारखाच आहे," असं होसबाळे म्हणाले. सर्वांनी एकत्रित प्रयत्न केला तरच भारत विश्वगुरु बनून जगाचं नेतृत्व करु शकेल, असंही होसबाळेंनी म्हटलं. संघ भारतामधील सर्वांची मतं आणि संप्रदायांच्या मतांचा मान-सन्मान करतो असंही होसबाळेंनी सांगितलं.
होसबाळेंनी संघाची विचारसरणी काय आहे यासंदर्भात भाष्य करताना, संघ उजव्या विचारणीचा नाही आणि डाव्या विचारसणीचाही नाही तर राष्ट्रवादी विचारसणीचा आहे. लोक त्यांची मतं आणि संप्रदायाचं पालन करत संघासाठी काम करु शकतात, असा दावा होसबाळेंनी केला. तसेच, "संघ कठोर नसून लवकचिक आहे," असंही होसबाळेंनी म्हटलं.
होसबाळेंनी संघाला समजून घेण्यासाठी मेंदू नाही हृदय हवं असं म्हटलं आहे. त्यांनी आपल्या भाषणामध्ये पुढील पीढीच्या कल्याणासाठी पर्यावरणाचं रक्षण करण्याची गरज असल्याचं मत मांडलं. होसबाळेंनी देशामध्ये लोकशाहीच्या स्थापनेमध्ये संघाचं मोलाची भूमिका होती असंही म्हटलं. या कार्यक्रमामध्ये राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे, भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष डॉ. महेश चंद्र यांच्याबरोबरच अनेक मोठे नेते उपस्थित होते. या कार्यक्रमामध्ये संघ हा राष्ट्रवादी विचारसणीचा असल्याचंही होसबाळेंनी म्हटलं.
होसबळेंनी केलेल्या विधानाप्रमाणेच केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान (Arif Mohammad Khan) यांनीही काही दिवसांपूर्वी हिंदूंसंदर्भात एका जाहीर कार्यक्रमामध्ये विधान केलं होतं. मल्याळी हिंदूंनी आयोजित केलेल्या हिंदू संम्मेलनाच्या उद्घाटन सोहळ्यामध्ये आपल्याला 'हिंदू' म्हणावं असं सांगितलं. हिंदू हा धार्मिक शब्द नाही तर एका विशेष भौगोलिक क्षेत्रामध्ये जन्माला आलेल्या लोकांसाठी तो वापरला जातो, असा युक्तीवाद खान यांनी केला होता.