दार्जिलिंगमधल्या वेगळ्या राज्याच्या आंदोलनाला पुन्हा हिंसक वळण

आंदोलकांनी गोरखालँड विभागीय प्राधीकरणाचं कार्यालय पेटवून दिलं. तसंच फॉरेस्ट बंगला, गयाबरी रेल्वे स्टेशनमध्येही आग लावण्यात आली. अनेक सरकारी वाहनांचीही आंदोलकांनी जाळपोळ केली. 

Updated: Jul 14, 2017, 11:26 AM IST
दार्जिलिंगमधल्या वेगळ्या राज्याच्या आंदोलनाला पुन्हा हिंसक वळण title=

दार्जिलिंग : तब्बल महिनाभरापासून सुरू असलेल्या दार्जिलिंगमधल्या वेगळ्या राज्याच्या आंदोलनाला आज पुन्हा हिंसक वळण लागलं. आंदोलकांनी गोरखालँड विभागीय प्राधीकरणाचं कार्यालय पेटवून दिलं. तसंच फॉरेस्ट बंगला, गयाबरी रेल्वे स्टेशनमध्येही आग लावण्यात आली. अनेक सरकारी वाहनांचीही आंदोलकांनी जाळपोळ केली. 

शहरातली इंटरनेट सेवा गेल्या 26 दिवसांपासून बंद ठेवण्यात आलीये. तसंच शहरात निमलष्करी दल आणि पोलिसांची मोठी कुमक आहे. असं असतानाही हिंसाचार अद्याप नियंत्रणात आलेला नाही... चौरक्षा-मॉल मार्गावरचं GTAचं आख्खं कार्यालय सकाळच्या वेळात आंदोलकांनी पेटवून दिलं. 

गोरखालँड आंदोलनाचा भाग म्हणून परिसरातले लेखक आणि कलाकारांनी आपापले पुरस्कार राज्य सरकारला परत केलेत. दार्जिलिंगमधल्या महिनाभर सुरू असलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर नॅशनल हायड्रल पॉवर कॉर्पोरेशननं आपला रामडी इथला प्रकल्प बंद करण्याचा निर्णय़ घेतलाय. राज्य सरकारनं प्रकल्पाला अधिक सुरक्षा पुरावावी, अशी मागणी प्रकल्प अधिकाऱ्यांनी केली आहे.