ISRO on Asteroid Apophis : कैक कोटी वर्षांपासून ही पृथ्वी आकाशगंगेमध्ये आपलं स्थान अबाधिक ठेवून आहे. अर्थात पृथ्वीच्या उत्पत्तीपासून आजमितीस असंख्य बदलांतून ती पुढे आली आणि सृष्टीची निर्मिती झाली. निसर्गाच्या याच चक्राचं एक अतिशय गंभीर किंबहुना अतिशय रौद्र आणि चिंता वाढवणारं एक रुप पृथ्वीच्या दिशेनं येण्याची शक्यता जगातील अनेक अंतराळ संशोधन संस्थांनी व्यक्त केली असून, इस्रोनंही या संकटाशी दोन हात करण्यासाठीचे प्रयत्न सुरू केल्याचं समजत आहे.
ISRO प्रमुख एस सोमनाथ यांनीसुद्धा पृथ्वीच्या दिशेनं येणाऱ्या अपोफिस (Apophis) लघुग्रहाविषयी चिंता व्यक्त करताना हा धोका गंभीर असल्याचं स्पष्ट केलं आहे. सोमनाथ यांनी एका मुलाखतीदरम्यान मांडलेल्या सिद्धांतानुसार एखादा लघुग्रह पृथ्वीवर आदळल्यास संपूर्ण जीवसृष्टीच नष्ट होईल. ज्या कारणास्तव सध्या इस्रोही अवकाशातील लहानमोठ्या घडामोडींवर लक्ष ठेवताना दिसत आहे. इस्रोकडून Apophis लघुग्रहाचा वेग आणि त्याचा मार्ग या साऱ्यावर लक्ष ठेवलं जात असून, त्यासाठी 'नेटवर्क फॉर स्पेस ऑबजेक्ट्स ट्रॅकिंग अँड अॅनालिसिस' (NETRA) प्रकल्प सुरु करण्यात आला आहे.
अधिकृत माहितीनुसार तीन फुटबॉल स्टेडियम, आयएनएस विक्रमादित्य नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियम मिळून जितका आकार तयार होतो तितक्या महाकाय आकाराचा हा लघुग्रह असल्याचं सांगितलं जात आहे. 2004 मध्ये या लघुग्रहासंदर्भातील प्राथमिक माहिती समोर आली होती. दरम्यान, हा लघुग्रह पृथ्वीला टक्कर देणार असल्याची भीती असली तरीही तशी शक्यता कमीच असल्याची बाबही नाकारता येत नाही. पण, तरीही ही विनाशकारी टक्कर होणारच नाही असंही सांगितलं जात नाहीय.
एपोफिस हा लघुग्रह 1230 फूट रुंद असून, त्याचा एकूण आकार पाहता सध्या जगभरातील अंतराळ संशोधन संस्था विविध स्तरावर निरीक्षण करताना दिसत आहेत. 2068 मध्ये हा लघुग्रह पृथ्वीवर धडकण्याची शक्यता आहे. पण, तत्पूर्वी तो दोनदा पृथ्वीच्या अतिशय जवळून जाणार आहे. 13 एप्रिल 2029 ही त्यापैकीच एक तारीख असून, यावेळी हा लघुग्रह पृथ्वीच्या 32 हजार किमी अंतरावरून जाईल. तर, 2036 मध्ये तो दुसऱ्यांदा पृथ्वीच्या जवळून जाणार आहे.
हा लघुग्रह पृथ्वीवर आदळल्यास मोठी हानी होऊ शकते. इतकंच नव्हे, तर तो जिथं आदळेल तिथं चारही बाजूंनी 20 किमीच्या अंतरापर्यंत भीषण विनाशाचं चित्र असेल, थोडक्यात जीवसृष्टीचा नाश होईल अशी भीती व्यक्त केली जात आहे.
अवकाशात फिरणारे अनेक खडक किंवा कोणतीही वस्तू सूर्याच्या उष्णतेमुळं आपली वाट बदलते. याला यार्कोवस्की प्रभाव म्हटलं जातं. याच प्रभावामुळं Apophis ची दिशाही बदलत असल्याचं सांगण्यात येत आहे. हा लघुग्रह पृथ्वीवर आदळण्याची शक्यता 1.50 लाखातून एकदाच आहे. पण, त्यासंदर्भातील सखोल माहिती मात्र 2029 मधील फ्लायबायनंतरच समोर येईल असं सध्या नासा, इस्रो आणि इतर देशातील अंतराळ संशोधन संस्थानी सांगितलं आहे.