Online Fraud : तंत्रज्ञानाच्या युगात सध्या आपल्याला सर्व घरी बसल्या सहज उपलब्ध होत आहे. जेवणापासून घरच्या वस्तूंपर्यंत आणि इलेक्ट्रिक सामानापासून कपड्यांपर्यंत सर्व ऑनलाईन (Online) मिळतं. साहजिकच ऑनलाईन शॉपिंगची (Online Shopping) क्रेझ वाढत चालली आहे. पण त्याचबरोबर ऑनलाईन फ्रॉडचे (Online Fraud) प्रकारही वाढू लागले आहेत. आरोपी फसवणूकीचे नवनविन प्रकार शोधून काढत असून लाखो रुपयांची फसवणूक होत आहे. फसवणूकीचा असाच एक प्रकार समोर आला आहे. एका विद्यार्थिनीने 510 रुपयांचा ड्रेस (Dress) ऑनलाईन मागवला, पण सायबर गुन्हेगारांनी (Cyber Crime) या मुलीच्या अकाऊंटमधून तब्बल 3 लाख रुपये लंपास केले.
काय आहे नेमकी घटना?
बिहारमधल्या (Bihar) गोपालगंज इथली ही घटना आहे. चुना गली परिसरात राहणाऱ्या साक्षी कुमारी या विद्यार्थिनीला ऑनलाईन फसवणूकीला सामोरं जावं लागलं. ऑनलाईन सर्च करत असताना साक्षीला एक ड्रेस आवडला. हजारात असणार हा ड्रेस ऑफरमध्ये केवळ 510 रुपयांत मिळत होता. साक्षीला तो ड्रेस आवडल्याने तीने तो ऑनलाईन ऑर्डर केला. ड्रेस खरेदी केल्यानंतर साक्षीच्या मोबाईलवर एक मेसेज आला. त्यानंतर साक्षीला एक फोन आला, फोनकर्त्याने आपण ऑनलाईन कंपनी 'मीशो'चा (Meesho) अधिकारी असल्याचं सांगितलं. तुम्हाला लकी ड्रॉमध्ये (Lucky Draw) पहिलं बक्षीस लागलं असून यात तुम्हाला 12 लाख 60 हजार रुपये कॅश किंवा टाटा सफारी (Tata Safari) कार जिंकल्याची माहिती दिली. इतकंच नाही तर फोन करणाऱ्या त्या व्यक्तीने कंपनीचं आयकार्ड आणि आधारकार्डची कॉपी तिच्या मोबाईलवर पाठवली.
बक्षिस मिळवण्यासाठी आला फोन
त्यानंतर सायबर गुन्हेगारांनी दुसऱ्या दिवशी पुन्हा साक्षीला फोन केला. लकी ड्ऱॉमध्ये लागलेलं बक्षिस मिळवण्यासाठी इन्कम टॅक्स, सिक्यूरिटी चार्जेस, टीडीएस, जीएसटी असे सर्व मिळून 3 लाख रुपये दिलेल्या अकाऊंटला ट्रान्सफर करायला सांगितले. साडेबारा लाखांच्या बक्षिसाच्या अपेक्षेने साक्षीने 3 लाख रुपये संबंधित अकाऊंटला ट्रान्सफर केले, आणि इथेच ती फसवली गेली. पैसे ट्रान्सफर झाल्यानंतर साक्षीला कोणताच मेसेज आला नाही. म्हणून साक्षीने पुन्हा त्या नंबरवर फोन केला, पण फोन बंद होता. आपण फसवलो गेल्याचं साक्षीच्या लक्षात आलं.
हे ही वाचा : Death Test : तुमचा मृत्यू कधी होणार? मृत्यूची परफेक्ट भविष्यवाणी करणारी टेस्ट
फसवणूकीबाबत केली पोलिसांत तक्रार
फसवणूक झाल्याचं कळताच साक्षीने पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली. सायबर पोलिस याप्रकरणी तपास करत असून बक्षिस मिळण्याच्या अपेक्षेने गुन्हेगारांच्या जाळ्यात अडकू नका असं आवाहन पोलिसांनी केलं आहे. एकट्या गोपालगंजमध्ये गेल्या सहा महिन्यात ऑनलाईन फसवणूकीची 45 प्रकरणं दाखल करण्यात आली आहेत.