Covid-19 : यूपीत टेस्टिंग, कर्नाटकात स्क्रिनिंग, महाराष्ट्रात... पाहा कोणत्या राज्यात काय सुरु आहे

चीनसह काही देशांमध्ये कोरोनाने थैमान घातलं असून देशात अलर्ट जारी करण्यात आला आहे, या पार्श्वभूमीवर विविध राज्यात खबरदारीच्या उपाययोजना सुरु करण्यात आल्या आहेत

Updated: Dec 21, 2022, 07:37 PM IST
Covid-19 : यूपीत टेस्टिंग, कर्नाटकात स्क्रिनिंग, महाराष्ट्रात... पाहा कोणत्या राज्यात काय सुरु आहे title=

Corona Update : चीनमध्ये (China) कोरोनाने (Corona) धुमाकूळ घातला असून भारतातही केंद्र सरकारने (Central Govenment) अलर्ट (Alert Notice) जारी केला आहे. या पार्श्वभूमीवर अनेक राज्यांनी त्या दृष्टीने तयारी सुरु केली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून महाराष्ट्रात टास्क फोर्सची (Maharashtra Task Force) बैठक बोलावलीय. दिल्लीत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आरोग्य अधिकाऱ्यांना पॉझिटिव्ह नमुण्यांचं जिनोम सिक्वेंसिंग ( Genome Sequencing) करण्याच्या सूचना दिल्या आहेत. पश्चिम बंगाल सरकारने राज्यात कोविडमुळे उद्भवू शकणाऱ्या परिस्थितीवर नजर ठेवण्याचे आदेश दिले आहेत. 

केंद्राची हायव्होल्टेज बैठक
चीनमधल्या कोरोना परिस्थितीमुळे केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविय (Dr Mansukh Mandaviya) यांनी आज वरिष्ठ अधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावली. कोरोनाचा प्रादुर्भाव अद्याप संपला नसून देशात अलर्ट जारी करण्यात आला आहे.  सर्व राज्यांनी कोरोना स्थितीवर लक्ष ठेवण्याची सूचना करण्यात आल्या असून जिनोम सिक्वेन्सिंगवर ( Genome Sequencing) लक्ष केंद्रित करा असंही सांगण्यात आलंय. तसंच कोरोनाचा (Corona) प्रसार रोखण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याबाबतही सूचना देण्यात आलीय. 

महाराष्ट्रात टास्क फोर्स स्थापन
महाराष्ट्रात कोरोनामुळे उद्भवणाऱ्या नव्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आणि ताबडतोब उपाय योजना करण्यासाठी राज्य सरकार टास्क फोर्स स्थापन करणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी दिली. चीनमध्ये नव्या व्हेरियंटमुळे कोरोना झपाट्याने पसरत असल्याने पुन्हा खबरदारी घेण्याची गरज असल्याचं विरोधी पक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी म्हटलं होतं. 

दिल्ली सरकार काय घेतेय खबरदारी?
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आरोग्य विभागाला कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी आवश्यक त्या उपाय योजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत. पॉझिटिव्ह प्रकरणात जिनोम सिक्वेंसिंग करण्यास आरोग्या विभागाला सांगण्यात आलं आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू नये यासाठी कठोर पावलं उचलण्याचे आदेशही केजरीवाल यांनी दिले आहेत.

उत्तर प्रदेशमध्ये काय परिस्थिती?
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेश सरकारही सतर्क झालं आहे. उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक यांनी सर्व संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना प्राथमिक उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत. विमानतळावर खबरदारीच्या उपाययोजनांबरोबरच परदेशातून आलेल्या प्रवाशांची कोविड टेस्ट करण्यास सांगण्यात आलं आहे. सर्दी, खोकला किंवा ताप अशी लक्षणं असणाऱ्या  प्रवाशांना होम आयसोलेशन (Home Isolation) करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. याशिवाय पॉझिटिव्ह रुग्णांच्या नोंदी ठेवण्यास सांगण्यात आलं आहे. 

कर्नाटकात विमानतळावर प्रवाशांचं स्क्रिनिंग
कर्नाटक सरकारने बंगळुरुतल्या केम्पागौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवाशांचं स्क्रिनिंग (Screening) करण्याचा निर्णय घेतला आहे. चीनसह इतर देशातल्या कोरोना स्थितीमुळे हे पाऊल उचलल्याचं कर्नाटक सरकारने सांगितलं आहे. सध्या असलेले रुग्ण आणि नविन रुग्णांमध्ये आढळणाऱ्या लक्षणांवरही नजर ठेवण्यास सांगण्यात आलं आहे. याशिवाय मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय मिटिंग बोलवण्यात आली आहे. 

हे ही वाचा : Covid-19 Update : पुन्हा बंधनं, पुन्हा मास्कसक्ती? कोरोना उद्रेकानंतर देशाची आरोग्य यंत्रणा अलर्टवर

पश्चिम बंगालमध्ये सतर्काता बाळगण्याचे आदेश
पश्चिम बंगालमध्ये आरोग्य अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याचे आदेश दिले असून कोरोना लाटेचा मुकाबला करण्यासाठी सज्ज असल्याचं म्हटलं आहे. नियमित स्वरुपात कोविड-19 चाचणी आणि तपासणी करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. मास्क, ऑक्सिजन, बेड आणि आवश्यक वैद्यकीय सुविधा सज्ज ठेवण्यास सांगण्यात आलं आहे.