Rohit Sharma Virat Kohli retired : टीम इंडियाने दक्षिण अफ्रिकेचा पराभव करून टी-ट्वेंटी वर्ल्ड कपवर आपली मोहोर उमटवली आहे. टीम इंडियाने वर्ल्ड कप जिंकला खरा, पण दोन मोठे धक्के बसले आहेत. टीम इंडियाचा स्टार खेळाडू विराट कोहली याने वर्ल्ड कप जिंकताच निवृत्ती जाहीर केले होती. त्यानंतर आता विराटनंतर रोहित शर्माने सुद्धा सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत आपण टी 20 क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याचे जाहीर केलंय. त्यामुळे आता टीम इंडियासाठी गड आला पण दोन सिंह गेले आहेत.
मी जेव्हापासून हा फॉरमॅट खेळायला सुरुवात केली तेव्हापासून मला खूप आनंद मिळत आहे. या फॉरमॅटला निरोप देण्याची उत्तम वेळ आहे. मला यातील प्रत्येक क्षण आवडला आहे. हा माझा शेवटचा खेळही होता आणि मला हेच हवं होतं की मला वर्ल्ड कप जिंकायचा होता. ते स्वप्न आता पूर्ण झालंय, असं रोहित शर्माने म्हटलं आहे.
माझ्या संघात असे खेळाडू मिळाल्याबद्दल मी खूप भाग्यवान आहे, जे खेळाडू माझ्यासाठी आणि टीम इंडियासाठी खेळत आहेत ते खरोखर चांगले आहेत आणि मी त्यांचा आभारी आहे, असंही रोहितने म्हटलं आहे. भारतासाठी खेळ जिंकणं, भारतासाठी ट्रॉफी जिंकणं, याचीच मी नेहमीच आतुरतेने वाट पाहत असतो, असंही रोहित शर्माने म्हटलं आहे.
दरम्यान, आम्ही गेल्या 3 ते 4 वर्षात कोणत्या परिस्थितीतून गेलोय हे सांगणं खूप कठिण आहे. खरं सांगायचं झालं तर आजच्या या विजयासाठी आम्ही वैयक्तिकरित्या आणि संघ म्हणून खूप कष्ट उपसले आहेत. आम्ही आज हे आज करून दाखवलं आहे असं नाही यामागे 3 ते 4 महिन्याची मेहनत आहे. संघ म्हणून आम्हाला वर्ल्डकप हवा होता. अशी स्पर्धा जिंकण्यासाठी पडद्यामागे खूप काम करावं लागतं, असंही रोहित शर्माने म्हटलं आहे.