Maharastra Politics : अजितदादांना 'जोर का झटका', के पी पाटलांनी घेतली मोठ्या पवारांची भेट

K P Patil Meet Sharad Pawar : कोल्हापुरात अजित पवार गटाला धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण माजी आमदार के पी पाटील यांनी शरद पवारांची भेट घेतली. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर के.पी पाटील तुतारी हाती घेणार का याची चर्चा सुरू झालीय. 

सौरभ तळेकर | Updated: Jun 29, 2024, 10:38 PM IST
Maharastra Politics : अजितदादांना 'जोर का झटका', के पी पाटलांनी घेतली मोठ्या पवारांची भेट title=
K P Patil Meet Sharad Pawar upset with the Mahayutti

K P Patil upset with the Mahayutti : अजित पवारांना पुन्हा एकदा धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेसचे राधानगरी भुदरगडचे माजी आमदार के पी पाटील यांनी शरद पवारांची भेट घेतल्यानं या चर्चांना सुरूवात झालीय.. के पी पाटील हे राधानगरी मतदारसंघाचे 2004 आणि 2009 या दोन टर्मचे आमदार राहिलेत.. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर तळ्यात-मळ्यात करत करत के पी पाटील हे अजित पवारांच्या गटात सामिल झाले... विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर केपी पाटील  तुतारी फुंकणार असल्याची चर्चा असतानाच ते अध्यक्ष असलेल्या कारखान्यावर कारवाई झाली.. त्यामुळे केपी पाटील गटात प्रचंड नाराजी असल्याचं पाहायला मिळतंय.. त्यात केपी पाटील यांनी शरद पवारांची भेट घेतल्यानं ते अजित पवार गटाला राम राम करणार असल्याचं बोललं जातंय. मात्र केपी पाटील यांनी या चर्चा फेटाळून लावल्यात. 

कोण आहेत के पी पाटील?

के पी पाटील राधानगरी मतदारसंघातून दोन टर्मचे आमदार आहेत. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर अजित पवार गटात प्रवेश केला होता. हसन मुश्रीफांचे निकटवर्तीय अशी ओळख त्यांची आहे. बिद्री साखर कारखान्याचे अनेक वर्ष अध्यक्ष देखील के पी पाटील राहिले आहेत. राधानगरी मतदारसंघात मोठी ताकद असल्याने अजित पवारांना मोठा धक्का मानला जातोय. कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात देखील के पी पाटील यांचा दबदबा आहे. के पी पाटील अजित पवार गटाला रामराम करण्याची तयारीत आहेत, त्याची कारणे काय?

के पी पाटील तुतारी हाती घेणार?

के पी पाटील विधानसभेसाठी इच्छुक आहेत. राधानगरीमध्ये शिंदे गटाचे प्रकाश आबिटकर विद्यमान आमदार आहेत. के पी पाटील यांना महायुतीचं तिकीट मिळणं अवघड मानलं जातंय. सत्तेत असूनही कारखान्यावर कारवाईमुळे नाराजी असल्याचं बोललं जातंय. त्यामुळे शरद पवार गटात गेल्यास उमेदवारीची शक्यता आहे. तर बिद्री साखर कारखान्यावर झालेली कारवाई हा सत्तेचा गैरवापर आहे असं म्हणत शरद पवार यांनी नाराजी व्यक्त केलीय.

तर दुसरीकडे अजित पवार गटाचे मंत्री अनिल पाटील हे भाजपच्या वाटेवर असल्याचं भाकित शरद पवार गटाचे नेते डॉ सतिश पाटील यांनी केलंय. लोकसभेच्या निकालानंतर अजित पवारांचे फासे उलटे फिरायला लागल्याचं पाहायला मिळतंय..काही नावं आता हळूहळू समोर यायला सुरूवात झालीय. अधिवेशन संपल्यानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीत भुकंप होण्याच्या शक्यता वर्तवण्यात येत आहे.