रामराजे शिंदे, झी मीडिया, नवी दिल्ली: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लागू करण्यात आलेला २१ दिवसांचा लॉकडाऊन संपल्यानंतर सार्वजनिक वाहतूक सुरु करण्यासाठी मोदी सरकारकडून विशेष रणनीती आखण्यात आली आहे. त्यानुसार सरकारने रेल्वे आणि विमान प्रवासासाठी विशेष खबरदारी घेण्याचे ठरवले आहे. या दोन्ही ठिकाणी प्रवाशांमध्ये अंतर राखण्यासाठी वेगवेगळे उपाय केले जाणार आहेत. तर न्यायालय, कुरियर सेवा आणि रेल्वे स्थानकांवर कोरोनाच्या तपासणीसाठी थर्मल स्कॅनिंगची यंत्रणा उभारली जाऊ शकते.
येत्या १४ एप्रिलला लॉकडाऊनचा कालावधी संपेल. त्यामुळे आता सरकारच्या हातात अवघे सात दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे या काळात संबंधित यंत्रणांची घडी बसवण्याचे मोठे आव्हान सरकारसमोर आहे. केंद्र सरकारकडून लवकरच यासंबंधीचे निर्देश जारी होण्याची शक्यता आहे.
सरकारच्या ड्राफ्टमध्ये नक्की काय?
* रेल्वे सेवा सुरु होणार, पण ज्या जिल्ह्यात कोरोनाचा एक पण रूग्ण आहे तिथे रेल्वे थांबणार नाही.
* रेल्वेत मीडल सीट बुकींग करता येणार नाही.
* प्लॅटफॉर्म तिकीट महाग केले जाईल.
* रेल्वेत मास्क आणि सॅनिटाईजर देण्याचा विचार.
* ज्या जिल्ह्यात कोरोना रुग्ण नसेल तिथे बससेवा सुरू केली जाईल.
* ज्या जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग नसेल तेथून लोक जिल्हात ये जा करू शकतील.
* शाळा, महाविद्यालये, विद्यापीठ, चित्रपटगृह, खाजगी संस्था या बंद राहणार. सर्वात शेवटच्या टप्प्यात सुरु होणार.
* काही मोजक्या ठिकाणी विमानसेवा सुरू केली जाईल. परंतु जिथे कोरोना पसरला आहे तिथे विमानसेवा बंदच राहील.
* न्यायालय, कुरियर सर्विस, रेल्वे स्टेशनवर थर्मल स्कॅनिंग होणार.
* विमानतळावर वृद्ध, गर्भावती महिला आणि लहान मुलांसाठी वेगळी रांग असेल.