नवी दिल्ली : केंद्रीय कर्मचारी तसेच पेन्शनधारकांच्या महागाई भत्त्यात तपात करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयावर काँग्रेसने टीका केली आहे. मोदी सरकारने सैनिक आणि कर्मचाऱ्यांचे महागाई भत्ते कापण्याऐवजी सेंट्रल विस्टा, बुलेट ट्रेनसारख्या योजना आणि वायफळ खर्च थांबवावे अशी टीका काँग्रेसने केलीय. सरकारी कर्मचाऱ्यांच्या भत्त्यामध्ये कपात केली जाऊ नये. अशा कठीण प्रसंगात केंद्रीय कर्मचारी आणि सैनिकांवर असा निर्णय लादणं योग्य नसल्याचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी म्हटले.
लाखो करोडोंची बुलेट ट्रेन योजना आणि सेंट्रल विस्टा सौंदर्यीकरण परियोजना थांबवण्याऐवजी कोरोनाशी लढून जनतेची सेवा करणाऱ्या केंद्रीय कर्मचारी, पेंशनर्स आणि देशातील सैनिकांचा महागाई भत्ता कापत आहे. हे सरकार असंवेदनशील आणि अमानवीय असल्याची टीका काँग्रेस खासदार आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली. तुम्ही मध्यमवर्गीयांकडून पैसे घेत आहात पण ते गरिबांना देत नाही तर सेंट्रल विस्टावर खर्च करत आहात.
माजी केंद्रीय अर्थमंत्री पी.चिदंबरम यांनी देखील सरकारच्या निर्णयावर टीका केली. काँग्रेस नेता वेणुगोपाल, रणदीप सिंह सुरजेवाला, मनीष तिवारी, सुप्रिया श्रीनाते, गौरव वल्लभ, रोहन गुप्ता आणि प्रविण चक्रवर्ती यांनी देखील सरकारच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित करत हा निर्णय तात्काळ मागे घेण्याची मागणी केली.
केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्याचे तीन भाग थांबवण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतलाय. यावर्षी १ जानेवारीपासून सुरु झालेला ४ टक्के महागाई भत्ता देखील यामध्ये येतो. कर्मचाऱ्यांना सध्याच्या दरानुसार महागाई भत्ता मिळत राहील.
महागाई भत्त्याचा सध्याचा दर १७ टक्के आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयाचा परिणान ५० लाख कर्मचारी तसेच ६१ लाख पेंशनधारकांवर होणार आहे.