नवी दिल्ली : देशात कोरोना रूग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी देशातील रूग्ण वाढीचा दर काही प्रमाणात मंदावला होता. परंतू आता पुन्हा रूग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. या विषणूवर मात मिळवण्यासाठी जगातील संपूर्ण देश Corona Vaccine वर प्रचंड मेहनत घेत आहेत. दरम्यान काही आठवड्यात भारतात देखील लसीकरण मोहिमेला सुरूवात करण्यात येईल. असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितले आहे. शिवाय भारत सर्वात जास्त लशींची खरेदी करणार असल्याचं देखील सांगण्यात येत आहे.
भारत १.६ अब्ज डोस विकत घेवून जगातील सर्वात जास्त कोरोना लस खरेदी करणारा देश असेल, असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तविला आहे. यामुळे ८० कोटी जनता किंवा ६० टक्के लोकांपर्यंत लस पोहोचणार आहे. संपूर्ण जगात विविध लसींवर संशोधन सुरू आहे. काही देशांमध्ये कोरोना लशीला हिरवा कंदिल देखील दाखवण्यात आला आहे.
आता लवकरच भारतात देखील कोरोना लस उपलब्ध होण्याची शक्यता पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केली. शुक्रवारी झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत ते बोलत होते. भारतात देखील लसीकरण मोहिमेला सुरूवात करण्यात येईल. कोरोना लसीची किंमत किती असेल. तिचे वितरण कशाप्रकारे होईल. इत्यादी विषयांवरून सध्या इतर राज्यांशी चर्चा सुरू असल्याचं मोदी म्हणाले.
इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) आणि भारत बायोटेकने या महिन्यात COVAXINचं तिसऱ्या टप्प्यातील परिक्षण सुरू केलं आहे. ज्यामध्ये २६ हजार स्वयंसेवक सामिल आहेत. शिवाय जुलै महिन्यापर्यंत २० ते २५ कोटी नागरिकांना लस देण्याचा आमचा प्रयत्न असेल असं देखील त्यांनी स्पष्ट केलं आहे.
त्याचप्रमाणे, लस वितरणात प्राधान्य दिले जाणार आहे. सर्वप्रथम आरोग्य कर्मचारी, कोरोना योद्धा यांना प्राथमिकता देण्यात येणार आहे. त्यानंतर ६५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना प्राधान्य दिले जाईल. मग ५०-६५ वर्षे वयोगटातील लोकांना प्राधान्य दिले जाईल.
त्यानंतर ५० वर्षांखालील लोक ज्यांना इतर रोग आहेत त्यांना लस दिली जाणार आहे. अशा प्रकारे भारतात लवकरच कोरोनावर लस येइल अशी दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.