कोरोना व्हायरसची बदलेली लक्षणं, सरकारपुढे मोठं आव्हान

देशामध्ये कोरोना व्हायरसच्या बदलेल्या लक्षणांमुळे सरकारपुढे मोठं आव्हान उभं राहिलं आहे. 

Updated: Apr 20, 2020, 11:08 PM IST
कोरोना व्हायरसची बदलेली लक्षणं, सरकारपुढे मोठं आव्हान title=

नवी दिल्ली : देशामध्ये कोरोना व्हायरसच्या बदलेल्या लक्षणांमुळे सरकारपुढे मोठं आव्हान उभं राहिलं आहे. भारतामध्ये बहुतेकांना कोरोनाचं हलकं संक्रमण होत आहे, पण आता लक्षणं आढळत नसलेल्यांनाही कोरोना झाल्याचं समोर आलं आहे. आयसीएमआरच्या डॉ. रमण गंगाखेडकर यांनी दिलेल्या माहितीनुसरा देशात कोरोनाच्या ८० टक्के रुग्णांना कोरोनाची लक्षणं दिसत नाहीत. 

आयसीएमआर म्हणजेच भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषदेने केलेल्या अभ्यासानुसार १०० रुग्णांमध्ये ८० लोकांमध्ये कोरोनाची लक्षणं आढळलेली नाहीत. यामुळे नेमक्या कुणाच्या टेस्ट करायच्या, असा प्रश्न सरकारपुढे आहे. आयसीएमआरने टेस्टिंगच्या रणनितीमध्ये बदल केले आहेत. कोरोना हॉटस्पॉटच्या भागामध्ये याची अंमलबजावणी केली जात आहे.

कोरोनाची लक्षणंच आढळत नसल्यामुळे टेस्ट कुणाच्या करायच्या ही अडचण आहे, असं आयसीएमआरने सांगितलं. ज्यांना कोरोना झाला आहे, त्यांच्या संपर्कात आलेल्या सगळ्यांची टेस्ट करणं, हा यावरचा उपाय आहे, पण सगळ्यांची टेस्ट करणं सोपं नाही. नागरिकांनी घाबरून न जाता सरकारने दिलेल्या नियमांचं पालन करावं, असा सल्ला आयसीएमआरने दिला आहे.

आरोग्य मंत्रालयाकडून कोरोनाची टेस्ट करण्यासंदर्भातली नियमावली बनवण्यात आली आहे. कोणाची टेस्ट करायची आणि कोणाची नाही? हे या नियमावलीमध्ये सांगण्यात आलं आहे. पण एवढी लोकसंख्या असलेल्या देशात कोरोनाची लक्षणं न आढळलेले रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळत असल्यामुळे, यंत्रणांपुढे मोठं आव्हान उभं राहिलं आहे.