ATM व्हॅन थेट ग्राहकांच्या घरासमोर; HDFC बँकेचा मोठा निर्णय

HDFC बँकेने लॉकडाऊनच्या काळात ग्राहकांना घरपोच पैसे देण्याची सुविधा सुरु केली आहे. 

Updated: Apr 9, 2020, 12:12 PM IST
ATM व्हॅन थेट ग्राहकांच्या घरासमोर; HDFC बँकेचा मोठा निर्णय title=

नवी दिल्ली: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक दैनंदिन व्यवहार ठप्प झाले आहेत. या पार्श्वभूमीवर HDFC बँकेने ग्राहकांच्या सोयीसाठी दोन महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. 
त्यानुसार HDFCकडून कर्जाच्या व्याजदरात ०.२० टक्क्यांची कपात करण्यात आली आहे. त्यामुळे गृह आणि वाहन कर्जधारकांना कमी व्याजात कर्ज मिळेल. काही दिवसांपूर्वीच भारतीय रिझर्व्ह बँकेकडून रेपो रेटचा व्याजदर ०.७५ बेसिस पॉईंटनी कमी केला होता. त्यामुळे बँकांकडूनही व्याजदरात कपात करून ग्राहकांना याचा लाभ दिला जात आहे. 

मोठी बातमी: मुंबईत कोरोनाच्या रॅपिड टेस्टला केंद्राची परवानगी

याशिवाय, HDFC बँकेने लॉकडाऊनच्या काळात ग्राहकांना घरपोच पैसे देण्याची सुविधा सुरु केली आहे. लॉकडाऊनच्या काळात प्रत्येकाला एटीएम किंवा बँकेपर्यंत पोहोचणे शक्य नसल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता HDFC बँकेची मोबाईल ATM व्हॅन ग्राहकांच्या घरापर्यंत जाईल. त्यासाठी HDFC बँक स्थानिक प्रशासनाची मदत घेणार आहे. ज्या भागातून पैशांसाठी जास्त मागणी होत असेल त्याठिकाणी HDFC बँकेची ATM व्हॅन जाईल. जेणेकरून त्या परिसरातील लोकांना आपल्या खात्यामधून पैसे काढणे शक्य होईल. यामुळे बँकेत पैसे काढण्यासाठी होणारी गर्दीही टळेल.

लॉकडाऊनमध्येही सोन्या-चांदीच्या दरात मोठे बदल

दरम्यान, आज सकाळपासून देशभरात कोरोना रुग्णांची संख्या १६६ ने वाढली आहे. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा ५,७३४ इतका झाला आहे. आज नव्याने आढळून आलेल्या रुग्णांमध्ये महाराष्ट्रातील १६२ जणांचा समावेश आहे.