Corona : देशात लॉकडाऊनचा कालावधी वाढण्याची स्पष्ट चिन्हं

कोरोना प्रभावित क्षेत्रांमध्ये काही विशिष्ट नियम लागू करण्याच्या विचारात राज्य शासन असल्याचं कळत आहे.

Updated: Apr 7, 2020, 09:04 AM IST
Corona : देशात लॉकडाऊनचा कालावधी वाढण्याची स्पष्ट चिन्हं title=
संग्रहित छायाचित्र

नवी दिल्ली :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशव्यापी लॉकडाऊनची घोषणा केल्यानंतर आता हा कालावधी संपण्यासाठी जवळपास आठवडाभराचा काळ उरला आहे. Coronavirus कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता त्यावर आळा घालण्यासाठी म्हणून हा उपाय योजण्यात आला. पण, कोरोनाची दहशत अद्यापही कमी झाल्यामुळे येत्या काळात देशातील कोरोना प्रभावित अशा किमान सात राज्यांमध्ये तरी लॉकडाऊनचा काळ वाढण्याची चिन्हं स्पष्ट दिसत आहेत. 

२१ दिवसांचा लॉकडाऊनचा काळ संपला तरीही त्यापुढे ही परिस्थिती कायम राहणार आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी त्यांच्या राज्यातील ही परिस्थिती नियंत्रणात येईपर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचं समर्थन केलं. शिवाय महाराष्ट्र, राजस्थान, उत्तर प्रदेश, आसाम, छत्तीसगड, झारखंड या राज्यांत लॉकडाऊनचा काळ आणखी काही दिवसांनी पुढे जाऊ शकण्याला आणि पूर्णपणे नियम शिथिल न करण्याच्या निर्णयाचं स्वागत केलं. 

आसाममध्ये आतापर्यंत २६ कोरोनाबाधित आढळून आले असले तरीही त्यांनी राज्यात लॉकडाऊन जाहीर करण्याचा निर्णयाला दुजोरा दिला. महाराष्ट्रात आतापर्यंत कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळले असून, मुंबई आणि पुणे या भागांमध्ये लॉकडाऊनचे नियम आणखा काही दिवस लागू असतील. इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार राजस्थानमध्येही कोरोना प्रभावित क्षेत्रांमध्ये काही विशिष्ट नियम लागू करण्याच्या विचारात राज्य शासन असल्याचं कळत आहे. 

 

योगी आदित्यनाथ यांनीही लॉकडाऊनचे नियम शिथिल करण्यामध्येही टप्पे असण्याचा विचार मांडला आहे. शिवाय राज्यातील जनतेला आणखी प्रतिक्षा करावी लागू शकते अशी चिन्हंही समोर ठेवली. देशात वाढणारा एकंदर कोरोना रुग्णांचा आकडा पाहता लॉकडाऊनवाचून पर्याय नसल्याची बाब एकमताने समोर येत आहे. याबाबत केंद्राकडून अद्यापही कोणती अधिकृत घोषणा झालेली नाही. तेव्हा आता सध्या सुरु असणारं लॉकडाऊन टप्प्याटप्प्याने कमी करणार की त्याचा कालावधी वाढवणार याकडेच साऱ्या देशाचं लक्ष आहे.