मुंबई : देशभरात लॉकडाऊनमुळे सगळेच लोकं आपापल्या जागीच आहेत. या काळात आपल्या जवळच्या मंडळींना देखील भेटणं कठीण होत चाललं आहे. असं असताना आपल्या भावी पत्नीला भेटायला गेलेल्या डॉक्टरवर लग्नाअगोदरच सासरवाडीत राहण्याची वेळ आली. एवढंच नव्हे तर पुढे काय झालं? हे अतिशय धक्कादायक आहे.
जोधपुर निवासी डॉक्टर विवेक मेहता आपल्या भावी पत्नीला सरप्राइज देण्यासाठी बीकानेरच्या गंगाधर परिसरात गेले. २१ मार्च रोजी गेलेले डॉक्टर अचानक झालेल्या लॉकडाऊनमुळे पुन्हा घरी परतू शकले नाही.
सुरूवातीला २१ दिवसांचा असलेला लॉकडाऊन वाढल्यामुळे मुलीच्या आई-वडिलांना मोठा प्रश्न पडला. लग्न न झालेल्या जावयाला आपल्या घरी एवढे दिवस कसं ठेवायचं? लग्नाअगोदरच नवरा-नवरी एकत्र राहत असल्यामुळे समाज काय म्हणले? यासारख्या अनेक प्रश्नांचा भडीमार मुलीच्या घरच्यांवर होत होता.
अशावेळी नेमकं काय करायचं? हा प्रश्न त्यांच्यासमोर होता. पूजा चोपडाशी लग्न ठरलेला डॉ. विवेक ३ मेपर्यंत इथेच राहणार हे स्पष्ट होतं. आता अशावेळी काय करायचं म्हणून पूजाच्या वडिलांनी बीकानेरमधील गंगहरच्या जैन समाजाच्या अध्यक्षांसमोर आली समस्या मांडली.
अखेर ३० दिवसांच्या प्रतिक्षेनंतर सासरच्या मंडळींनी जावयाचं आणि मुलीचं लग्न लावण्याचा निर्णय घेतला. विवेकच्या घरची मंडळी या लग्नाला येणं शक्य नव्हतं. तरी देखील सोमवारी विवेक आणि पूजा विवाहबंधनात अडकले. या लग्नाला वरपक्ष नव्हता पण वधू पक्षाच्या उपस्थितीत हा लग्नसोहळा पार पडला.
डॉ. विवेकच्या कुटुंबियांनी आणि मित्रांनी हा सोहळा व्हिडिओ कॉलद्वारे पाहिला. एवढंच नव्हे तर फॅशन डिझाइनर असलेल्या पूजाने सासू-सासऱ्यांचे व्हिडिओ कॉलवर आशिर्वाद घेतले.