देशात १४,३७८ कोरोनाग्रस्त; मरकजमुळे २३ राज्यात व्हायरसचा फैलाव

23 राज्यांतील 47 जिल्ह्यांमध्ये गेल्या 28 दिवसांपासून कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नसल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाचे 

Updated: Apr 18, 2020, 06:15 PM IST
देशात १४,३७८ कोरोनाग्रस्त; मरकजमुळे २३ राज्यात व्हायरसचा फैलाव title=
संग्रहित फोटो

नवी दिल्ली : देशात कोरोनाबाधितांची संख्या वाढत ती 14 हजार 378वर पोहचली आहे. त्यापैकी 4,291 प्रकरणं तबलिगी जमातशी जोडलेली आहेत. 23 राज्यात मरकज प्रकरणामुळे कोरोनाग्रस्तांमध्ये वाढ झाली. गेल्या 24 तासांत 43 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मात्र एक दिलासादायक बाब म्हणजे, 23 राज्यांतील 47 जिल्ह्यांमध्ये गेल्या 28 दिवसांपासून कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नसल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी दिली आहे.

देशात आतापर्यंत 480 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासांत 991 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर गेल्या 24 तासांत 243 रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत एकूण 1992 रुग्ण कोरोनामुक्त झाल्याचं अग्रवाल यांनी सांगितलं.

मरकज प्रकरणानंतर देशातील 23 राज्यांमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. आसाममध्ये तबलिगी जमातमुळे 91 टक्के कोरोना रुग्ण वाढले. तर दिल्लीत 63 टक्के कोरोनाचे रुग्ण तबलिगीशी जोडलेले आहेत. यूपीमध्ये 59 टक्के प्रकरणं जमातीशी निगडीत आहेत. तमिळनाडूत 84 टक्के, तेलंगाणामध्ये 79 टक्के तर आंध्रप्रदेशमध्ये 61 टक्के कोरोनाबाधितांचं मरकज कनेक्शन आहे.

एकूण प्रकरणांमध्ये 29 टक्के प्रकरणं निजामुद्दीन मरकजशी जोडलेले आहेत.

आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, कोरोना व्हायरसमुळे झालेल्या मृत्यूंमध्ये 14.4 टक्के लोकांचं वय 45 हून कमी होतं. तर 10.3 टक्के कोरोना मृतांमध्ये 45 ते 60 वयोगटातील लोकांचा समावेश होता.

60 ते 75 वयोगटातील 33.1 टक्के लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. तर 42.4 टक्के मृत्यू झालेल्या प्रकरणांमध्ये मृतांचं वय 75 वर्षाहून अधिक होतं.