हैदराबाद: देशात कोरोनाव्हायरसचा कहर वाढत असताना एक चांगली बातमी समोर येत आहे. देशाला आणखी एक कोरोना लस Corona Vaccine मिळू शकेल अशी चिन्ह आहेत. रशियामध्ये बनवलेली कोरोना विषाणूची लस स्पुतनिक -5( Sputnik-5) ला भारतात मंजूरी दिली जाऊ शकते.
रशियन कोरोना विषाणूच्या वॅक्सिन स्पुतनिक -5 (Sputnik-5)ला येत्या काही आठवड्यांत भारतीय औषध नियामकांकडून मंजूरी मिळू शकते. डॉ. रेड्डीज यांनी स्पुतनिक (Sputnik-5 Vaccine) लस भारतात आणण्यासाठी 'रशिया डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंड' शी करार केल्याची माहिती डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि एपीआय दीपक सप्रा यांनी दिली. येत्या काही आठवड्यात आम्हाला मान्यता मिळेल अशी आशा असल्याचेही ते म्हणाले. ही लस दोन डोसची लस असेल. पहिला डोस घेतल्यानंतर 21 व्या दिवशी दुसरा डोस घ्यावा लागणार आहे.
लस घेतल्याच्या 28 आणि 42 व्या दिवशी प्रतिकारशक्ती विकसित होईल. रविवारी संध्याकाळी आयोजित वेबिनार दरम्यान सप्रा यांनी आपले विचार मांडले. स्पुतनिक लसीबद्दल विचारल्यावर त्यांनी ही बातमी दिली.
2021 मध्ये सुरुवातीला भारतात केवळ आठ ते नऊ हजार संसर्गाची नोंद झाली होती, परंतु कोविडच्या दुसर्या लाटेने गेल्या काही आठवड्यांमध्ये चिंता निर्माण केली आहे. भारतात कोरोनाची प्रकरणे सातत्याने वाढत आहेत. सोमवारी 68000 पेक्षा जास्त रुग्णांची नोंद झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या मते, गेल्या 24 तासांत भारतात कोरोनाचे 68,020 नवीन रुग्ण वाढले आहेत. देशात कोरोना संक्रमितांची संख्या 1,20,39,644 वर पोहोचली आहे.
गेल्या 24 तासात 291 लोकांचा मृत्यूही झाला आहे. यासह एकूण मृत्यूची संख्या वाढून 1,61,843 झाली आहे. त्याचबरोबर, देशातील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या 5,21,808 आहे आणि आतापर्यंत 1,13,55,993 लोकांनी कोरोनावर मात केला आहे. देशातील एकूण 6,05,30,435 लोकांना कोरोना विषाणूची लस देण्यात आली आहे.
भारतातील दुसर्या लाटेमुळे बर्याच राज्यात बरेच कठोर निर्बंध लागू होत आहेत. सर्वात वाईट परिस्थिती महाराष्ट्रात आहे. राज्यात रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. महाराष्ट्रात 28 मार्चपासून नाईट कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. कोरोनाच्या वाढत्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर मध्य प्रदेशात निर्बंध कायम आहेत. आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की महाराष्ट्रासह पंजाब, कर्नाटक, छत्तीसगड आणि गुजरातमध्ये संसर्ग वाढत आहे. केंद्राच्या म्हणण्यानुसार महाराष्ट्र, कर्नाटक, पंजाब, मध्य प्रदेश, गुजरात, केरळ, तामिळनाडू आणि छत्तीसगडमध्ये 84.5 टक्के नवीन प्रकरणांची नोंद झाली आहे.