देशात कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला; २४ तासात २५५३ नवे रुग्ण

24 तासांत 72 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 

Updated: May 4, 2020, 09:45 AM IST
देशात कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला; २४ तासात २५५३ नवे रुग्ण title=
संग्रहित फोटो

नवी दिल्ली : भारतात कोरोना व्हायरसचा कहर दिवसेंदिवस वाढतोच आहे. कोरोना व्हायरसवर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकारकडून अनेक प्रयत्न सुरु आहेत. कोरोनाग्रस्तांचा वाढता आकडा देशाची चिंता वाढवणारा ठरत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी देशात सरकारकडून विविध उपायांची अंमलबजावणीही करण्यात येत आहे. देशात सध्या 29 हजार 453 जणांवर कोरोनावरील उपचार सुरु आहेत. तर देशात मृतांचा आकडा वाढून तो 1373वर पोहचला आहे.

देशात आतापर्यंत 42 हजार 533 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी 11 हजार 707 लोक कोरोनातून मुक्त झाले आहेत. 

गेल्या 24 तासांत देशात 2553 नवीन कोरोनाग्रस्त आढळले आहेत. तर 24 तासांत 72 जणांचा मृत्यू झाला आहे. 

कोरोनाचा रिकव्हरी रेट 27.52 टक्के इतका आहे. ICMRने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत एकूण 11 लाख 7 हजार 233 लोकांच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत.

आजपासून देशात लॉकडाऊन 3.0 सुरु करण्यात आला आहे. हा लॉकडाऊन 17 मेपर्यंत सुरु राहणार आहे. या लॉकडाऊन दरम्यान देशात अनेक शहरांत अटी-शर्तींसह सूट देण्यात आली आहे. देशात ग्रीन झोन असलेल्या भागात सर्वाधिक सूट देण्यात आली आहे. तर रेड झोनमध्ये देण्यात आलेल्या अटींची अतिशय कठोरपणे अंमलबजावणी करण्यात येणार आहे. 

कोरोना व्हायरसचा प्रभाव पाहता देशाची ग्रीन, ऑरेंज आणि रेड झोनमध्ये विभागणी करण्यात आली आहे. ग्रीन झोनमध्ये 319 जिल्हे तर ऑरेंज झोनमध्ये 284 जिल्हे आहेत. दिल्ली, मुंबई, कोलकाता, अहमदाबादसह 130 जिल्हे रेड झोन जाहीर करण्यात आले आहेत.