Corona In India : आता कोरोना टेस्ट रिपोर्ट बंधनकारक; कोरोनाबाबत केंद्र सरकारचा दुसरा मोठा निर्णय

चीननंतर आता दुसऱ्या देशांना देखील कोरोनाची चिंता सतावू लागलीये. अशा परिस्थितीत भारत सरकार (India Government) देखील अलर्टवर आलंय. यामध्ये केंद्र सरकारने आता एक मोठा निर्णय घेतला आहे.

Updated: Dec 29, 2022, 04:06 PM IST
Corona In India : आता कोरोना टेस्ट रिपोर्ट बंधनकारक; कोरोनाबाबत केंद्र सरकारचा दुसरा मोठा निर्णय title=

Corona In India : चीनमध्ये (China) कोरोनाने रूद्र रूप धारण केलं आहे. या ठिकाणी रूग्णांना हॉस्पिटलमध्ये जागा मिळत नाहीये, औषधांची कमतरता जाणवतेय शिवाय चहूबाजूला कोरोनाने थैमान घातलं आहे. चीननंतर आता दुसऱ्या देशांना देखील कोरोनाची चिंता सतावू लागलीये. अशा परिस्थितीत भारत सरकार (India Government) देखील अलर्टवर आलंय. यामध्ये केंद्र सरकारने आता एक मोठा निर्णय घेतला आहे.

कोरोना व्हायरसच्या BF.7 व्हेरिएंटचा धोका पाहता, केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने चीनसोबत 5 देशांतून येणाऱ्या प्रवाशांसाठी RT-PCR टेस्ट अनिवार्य केली आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी गुरुवारी ट्विट करत ही माहिती दिली आहे.

आरोग्यमंत्री मनसुख मांडविया म्हणाले की, 1 जानेवारी 2023 पासून चीन, हाँगकाँग, दक्षिण कोरिया, सिंगापूर तसंच थायलंडवरून येणाऱ्या प्रवाशांसाठी RT-PCR टेस्ट अनिवार्य करण्यात आली आहे. यावेळी त्यांना प्रवास करण्यापूर्वी कोरोना चाचणीचा अहवाल एयर सुविधा पोर्टलवर अपलोड करावा लागणार आहे.

अमेरिकेत चिंताजनक परिस्थिती

अमेरिकेतील कोरोनाबाबत चिंताजनक आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. AAP नुसार, 22 डिसेंबर रोजी संपलेल्या आठवड्यात, अमेरिकेत सुमारे 48 हजार मुलांना कोरोनाची लागण झाली. त्याचवेळी, यूएस सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शनने (CDC) जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, अमेरिकेत 10 कोटींहून अधिक कोविड-19 चे रुग्ण नोंदवले गेले आहेत.

कोरोनाचा धोका वाढत आहे

वृत्तसंस्था शिन्हुआच्या अहवालानुसार, महामारीच्या सुरुवातीपासून देशातील सुमारे 15.2 दशलक्ष मुलांना कोविड-19 ची लागण झाल्याचे आढळून आले आहे. अहवालात असे म्हटले आहे की गेल्या चार आठवड्यात यापैकी सुमारे 165,000 प्रकरणे नव्याने नोंदवली गेली आहेत.

देशात 10 कोटी कोरोना रुग्ण

बुधवारी सीडीसीच्या नवीन आकडेवारीनुसार, 21 डिसेंबरपर्यंत देशात 100,216,983 कोविड -19 रुग्णांची नोंद झाली आहे. वृत्तसंस्था शिन्हुआच्या अहवालानुसार, जगभरात 100 दशलक्ष कोविड-19 रुग्णांची नोंद करणारा अमेरिका हा पहिला देश आहे. तज्ज्ञांनी सांगितले की वास्तविक ही संख्या खूप जास्त आहे. कारण घरी चाचणी करणारे लोक त्यांचे निकाल सार्वजनिक आरोग्य विभागाकडे पाठवत नाहीत आणि बरेच लोक चाचणी करुन घेत नाहीत, असे दिसून आले आहे. 

दरम्यान, सीडीसी डेटानुसार अमेरिकेमध्ये 1.08 दशलक्षाहून अधिक लोक कोरोनाचा उद्रेक झाल्यापासून COVID-19 मुळे मृत्यू पावले आहेत.