संसदेतही कोरोनाचा धोका; दुष्यंत सिंहांच्या संपर्कात आलेल्या 'त्या' खासदाराचा खुलासा

माजी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यादेखील सेल्फ आयसोलेशनमध्ये गेल्या आहेत. 

Updated: Mar 20, 2020, 08:00 PM IST
संसदेतही कोरोनाचा धोका; दुष्यंत सिंहांच्या संपर्कात आलेल्या 'त्या' खासदाराचा खुलासा title=

नवी दिल्ली: देशभरात कोरोना व्हायरसचा (Coronavirus) झपाट्याने फैलाव होत असतानाच आता आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. कोरोनाचे संकट आता थेट संसदेपर्यंत येऊन पोहोचले आहे. सध्या दिल्लीत संसदेचे अधिवेशन सुरु आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असूनही हे अधिवेशन स्थगित करण्यात आले नव्हते. मात्र, आता खासदार डेरेक ओब्रायन यांनी आपण काही दिवस भाजप नेते दुष्यंत सिंह यांच्या संपर्कात असल्याचा खुलासा केल्यानंतर खळबळ उडाली आहे. 

दुष्यंत सिंह आणि त्यांची आई वसुंधरा राजे हे दोघे सेल्फ आयसोलेट झाले आहेत. काही दिवसांपूर्वी या दोघांनी बॉलिवूड गायिका कनिका कपूर हिने लखनऊमध्ये आयोजित केलेल्या पार्टीला हजेरी लावली होती. मात्र, आजच कनिकाला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. यानंतर वसुंधरा राजे आणि दुष्यंत सिंह यांनी स्वत:ला सेल्फ आयसोलेट करण्याचा निर्णय घेतला होता. 

Coronavirus: भाजप नेत्या वसुंधरा राजे सेल्फ आयसोलेशनमध्ये

यानंतर आता डेरेक ओब्रायन यांनी आपण काही दिवस दुष्यंत सिंह यांच्या संपर्कात असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे कोरोनाचा धोका संसदेपर्यंत येऊन ठेपल्याचा अंदाज आहे. विशेष म्हणजे माजी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यादेखील सेल्फ आयसोलेशनमध्ये गेल्या आहेत. त्या गुरुवारी दिल्लीत खासदार कनिमोझी यांच्या घरी झालेल्या पार्टीवेळी दुष्यंत सिंह यांना भेटल्या होत्या. त्यामुळे आता अधिवेशनाला उपस्थित असणाऱ्या खासदारांच्या आरोग्याविषयी प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान, काहीवेळापूर्वीच डेरेक ओब्रायन यांनीही स्वत:ला सेल्फ आयसोलेट केल्याचे समजते.

गायिका कनिकाला कोरोनाची लागण, पार्टीत १०० सेलिब्रेटी सहभागी

देशभरात आतापर्यंत २२३ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. गेल्या २४ तासांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या ५० ने वाढली आहे. या पार्श्वभूमीवर दिल्लीत किराणा आणि औषधाची दुकाने वगळून इतर दुकाने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तर २२ मार्चला जनता कर्फ्युच्या दिवशी दिल्ली मेट्रोही बंद ठेवण्यात येईल.