कोरोनाचा धोका कायम : देशात २०६ बाधित, पाचव्या मृत्यूची नोंद

 देशात २०६ कोरोना रुग्ण असल्याची नोंद झाली आहे.  

सुरेंद्र गांगण | Updated: Mar 20, 2020, 07:53 PM IST
कोरोनाचा धोका कायम : देशात २०६ बाधित, पाचव्या मृत्यूची नोंद title=
संग्रहित छाया

नवी दिल्ली : कोरोनाचा फैलाव थांबण्याचे नाव घेत नाही. त्यामुळे प्रत्येकांनी काळजी घेण्याची गरज आहे. गर्दी टाळा असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, देशात २०६ कोरोना रुग्ण असल्याची नोंद झाली आहे. तर महाराष्ट्रात ५२ रुग्णांवर उपचार सुरु आहे. तर देशात पाचव्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे अनेक शहरात व्यवहार बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहे. जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा होणार आहे. अन्य व्यवहार बंद ठेवण्यात येणार आहे.

भारतात आतापर्यंत प्राणघातक कोरोनाव्हायरसच्या २०६ जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहे, याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी दिली.  कोविड-१९ च्या रुग्ण संख्येत वाढ होत आहे. ६७०० जणांना देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. कोरोनाबाबत काही माहिती हवी असेल किंवा मदतीची गरज असेल त्यांच्यासाठी १०७५ हा टोल फ्रि क्रमांक जारी करण्यात आला आहे. तसेच कोणीही अफवा पसरवू नये, असेही आवाहन करण्यात आले आहे.

कोरोना व्हायरस रोखण्यासाठी प्रयत्न सुरु असताना देशात पाचव्या मृत्यूची नोंद झाली आहे. इटलीहून भारतात आलेल्या ६९ वर्षीय नागरिकाचा मृत्यू झाला आहे. भारतात सापडलेल्या कोरोना रुग्णांच्या पहिल्या बॅचमध्ये या नागरिकाचा समावेश होता. ह्दय बंद पडल्याने राजस्थानमधील जयपूरमध्ये या नागरिकाचा मृत्यू झाला, अशी माहिती पीटीआयने रुग्णालयातील अधिकाऱ्याच्या हवाल्याने दिली आहे.

दरम्यान, कोरोनासंदर्भात सुरु असलेल्या प्रत्येक संशोधनावर सरकारचे सातत्याने लक्ष असून, संबंधितांच्या सतत संपर्कात आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी आज लोकसभेत दिली. शून्य प्रहरात सुरू असलेल्या चर्चेच्या वेळी ते बोलत होते. कोरोना बाधेसंदर्भात कोणाची चाचणी करायची याबाबतचे निर्देश आणि वैद्यकीय सल्ला स्पष्ट आहे, असं त्यांनी सांगितले. ३ डिसेंबर २०१९ रोजी चीनमध्ये पहिल्या कोरोना बाधेची नोंद झाल्यावर भारताने लगेचच आठ जानेवारी २०२० रोजी आरोग्य मंत्रालयात तांत्रिक विशेषज्ज्ञांची पहिली बैठक आयोजित केली होती, अशी माहितीही त्यांनी दिली.