सेबीत नियुक्तीचा वादः बाहेरच्या व्यक्तीला कार्यकारी संचालक बनवलं, कर्मचारी अधिकारी नाराज; आता पुढे काय?

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसरार, SEBI लवकरच हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड (HUL) च्या माजी कर प्रमुख शिखा गुप्ता यांची कार्यकारी संचालक (ED) पदावर नियुक्ती करणार आहे. ही माहिती समोर येताच सेबीमधून निषेध केल जात आहे.   

शिवराज यादव | Updated: Nov 29, 2024, 07:32 PM IST
सेबीत नियुक्तीचा वादः बाहेरच्या व्यक्तीला कार्यकारी संचालक बनवलं, कर्मचारी अधिकारी नाराज; आता पुढे काय? title=

सेक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियामध्ये (SEBI) पुन्हा एकदा नियुक्तीवरुन वाद पेटला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सेबीचे अधिकारी आणि कर्मचारी, संघटनेतील व्यक्तीऐवजी बाहेरच्या उमेदवाराला कार्यकारी संचालक (ED) पदावर आणण्यावरुन नाराज आहेत. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, SEBI लवकरच हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेडच्या (HUL) माजी कर प्रमुख शिखा गुप्ता यांची कार्यकारी संचालक (ED) पदावर नियुक्ती करणार आहे. ही माहिती समोर येताच सेबीमध्ये विरोध होऊ लागला आहे. या पदावर अशा व्यक्तीला आणावे, ज्याने सेबीमध्ये काम केले आहे आणि ज्याच्या कार्यक्षमतेवर शंका नाही, असं अधिकाऱ्यांचे म्हणणं आहे.

अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी

बाहेरील उमेदवारांना सातत्याने प्राधान्य दिलं जात असल्याने सेबीचे अनेक अधिकारी नाराज आहेत. सेबीमधील हुशार अधिकाऱ्यांकडे दुर्लक्ष केल्यास संस्थेच्या कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य खचू शकते असं मत त्यांनी स्पष्टपणे मांडलं आहे. 

दरम्यान या मुद्द्यावरुन वाद होण्याची ही पहिलीच वेळ नाही. 2022 मध्येही अशीच स्थिती निर्माण झाली होती, जेव्हा प्रमोद राव यांची ICICI बँकेतून ED पदावर नियुक्ती करण्यात आली. त्यावेळीही त्यांच्या सेबीच्या प्रमुख माधवी पुरी बुच यांच्याशी असलेल्या संबंधांवर प्रश्न उपस्थित करण्यात आले होते.

धवल बुच कनेक्शन?

दरम्यान यावेळी हा वाद केवळ बाहेरच्या उमेदवाराच्या नियुक्त्यापुरता मर्यादित नाही. शिखा गुप्ता यांच्या नियुक्तीमध्ये सेबीच्या प्रमुख माधवी पुरी बुच यांचे पती धवल बुच यांचा अप्रत्यक्ष प्रभाव असल्याचा आरोप काही अधिकाऱ्यांनी केला आहे. 

नव्या हाय प्रोफाईल नियुक्तीमध्ये धवल बुच कनेक्शनचीही चर्चा असल्याचा आरोप आहे. माधवी बुच यांचे पती ज्या हिंदुस्थान युनिलिव्हर कंपनीत काम करत होते तिथेच ट्रान्झॅक्शन हेड म्हणून शिखा गुप्तांनी काम पाहिलं आहे. अशा स्थितीत ही नियुक्तीही काही वैयक्तिक संबंधातून झाली आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

सेबीच्या निःपक्षपातीपणावर प्रश्नचिन्ह

सेबीचा हा वाद अशावेळी समोर आला आहे जेव्हा संस्थेची प्रतिमा मजबूत ठेवण्याची गरज भासत आहे. अशा निर्णयांमुळे संस्थेच्या कार्यपद्धतीवर आणि निःपक्षपातीपणावर प्रश्न निर्माण होऊ शकतात, असं अनेक तज्ज्ञांचं म्हणणं आहे. सेबीमधील अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, बाहेरील उमेदवारांच्या नियुक्तीमुळे संस्थेच्या कर्मचाऱ्यांचा आत्मविश्वास कमकुवत होतोच, शिवाय SEBI मधील प्रतिभेला महत्त्व दिले जात नाही असा संदेशही जात आहे. 

आता सेबी पुढे काय करणार?

सेबीच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये वाढलेली नाराजी पाहता हा प्रश्न कसा हाताळला जातो हे पाहणं औत्सुक्याचं असणार आहे. हा वाद संपवण्यासाठी सेबी काही पावलं उचलेल की या नियुक्तीमुळे भविष्यात संस्थेत आणखी तणाव निर्माण होईल? हे पाहावं लागेल.