कोरोनाची लस येण्यापूर्वीच वाद, सुन्नी जमीयत उलेमाचा सरकारला सवाल

कोरोनावरील लसींबाबत सोशल मीडियावर अफवा 

Updated: Dec 24, 2020, 03:53 PM IST
कोरोनाची लस येण्यापूर्वीच वाद, सुन्नी जमीयत उलेमाचा सरकारला सवाल title=

मुंबई : सगळं जग कोरोनाच्या लसीची वाट बघतंय. मात्र यापैकी काही लसींमध्ये डुक्कराची चरबी असल्याची अफवा सोशल मीडियावर पसरली आहे. लस उत्पादकांनी या चर्चेत तत्थ्य नसल्याचं सांगितलं असलं तरी काहींचं मात्र त्यामुळे समाधान झालेलं नाही. त्यामुळेच ऑल इंडिया सुन्नी जमीयत उलेमानं एक बैठक घेतली. यात लसीमध्ये डुक्कराचं मास वापरलं आहे की नाही, असा सवाल यावेळी करण्यात आला. 

डुक्कराचं मांस इस्लाममध्ये निषिध्द असल्यानं लसीमध्ये त्याचा वापर करण्यात येत असेल तर सरकारनं त्याची आधीच कल्पना द्यावी, असं सुन्नी जमीयत उलेमानं म्हटलं आहे. सरकारने मौलवींशी चर्चा करावी आणि मगच ही लस वापरायची की नाही याचा निर्णय घेण्यात येईल असंही सांगण्यात आलं आहे.

यावरून मुस्लीम विचारवंतांमध्ये दुमत आहे. कुणाचा जीव वाचवण्यासाठी हराम गोष्टींचा वापर होत असेल, तर तो मान्य असतो असं अतिकऊर रहेमान यांनी म्हटलं आहे. तर डुक्कराचं मांस नसल्याची पूर्ण खात्री पटल्याशिवाय लस घेणार नाही, असं रजा अकादमीचे प्रमुख मौलाना सईद नूरी यांनी म्हटलं आहे.

लसीतील डुक्करच्या मांसावरून जगभरात वाद उफाळला आहे. विशेषतः मुस्लीम राष्ट्रांमध्ये यावरून गोंधळ उडाला असताना काही देशांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. संयुक्त अरब अमिरातींनी पोर्क जिलेटिन असलेल्या लसींना मान्यता दिली आहे. माणसांचा जीव वाचवण्यास प्राधान्य देण्यात येईल, असं UAEच्या फतवा परिषदेनं स्पष्ट केलं आहे.