Sonia Gandhi Retirement: सोनिया गांधी राजकारणातून संन्यास घेणार? काँग्रेस बैठकीतील विधानामुळे खळबळ

Sonia Gandhi Retirement: काँग्रेस (Congress) पक्षाच्या रायपूरमधील अधिवेशनात सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी भावूक भाषण दिलं. सोनिया गांधींनी आपल्या भाषणात आपला 25 वर्षाचा राजकीय प्रवास उलगडताना आतापर्यंत मिळवलेलं यशही सांगितलं. सोनिया गांधींनी 1998 पासूनचा आपला प्रवास सांगत केलेल्या या भावूक भाषणामुळे त्या लवकरच राजकारणातून संन्यास (Retirement) घेतील अशी चर्चा रंगली आहे.   

Updated: Feb 25, 2023, 07:09 PM IST
Sonia Gandhi Retirement: सोनिया गांधी राजकारणातून संन्यास घेणार? काँग्रेस बैठकीतील विधानामुळे खळबळ title=

Sonia Gandhi Retirement: छत्तीसगडच्या रायपूर (Raipur) येथे काँग्रेसचं (Congress) अधिवेशन सुरु असून यावेळी पक्षाच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी भावूक भाषण (Sonia Gandhi Speech) केलं. सोनिया गांधी यांनी 1998 ला काँग्रेसचं अध्यक्षपद स्वीकारल्यापासून ते आतापर्यंतचा आपला राजकीय प्रवास उलगडला. यावेळी त्यांनी आपल्या सहकाऱ्यांचेही आभार मानले. यावेळी व्हिडीओच्या माध्यमातून सोनिया गांधींचा प्रवास आणि पक्षासाठी दिलेलं योगदान यासंबंधी माहिती देण्यात आली. मात्र सोनिया गांधींनी यावेळी केलेल्या भाषणामुळे त्या सक्रीय राजकारणातून संन्यास (Sonia Gandhi Retirement) घेणार असल्याची चर्चा रंगली आहे. 

काँग्रेसच्या या 85 व्या अधिवेशनात सोनिया गांधींचा प्रवास उलगडताना त्यांनी पक्षासाठी दिलेलं योगदान, यश याची माहिती व्हिडीओतून देण्यात आली. हा व्हिडीओ दाखवण्यात आल्यानंतर सोनिया गांधी यांनी भावूक भाषण केलं. या भाषणात त्यांनी आपल्या नेतृत्वात युपीएच्या कार्यकाळातील अनेक गोष्टींसाठी सर्वांचे आभार मानले. सोनिया गांधींच्या या भाषणामुळे त्या सक्रीय राजकारणातून संन्यास घेणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. 

सोनिया गांधींनी आपल्या भाषणात सांगितलं की, 1998 मध्ये काँग्रेस अध्यक्षपद घेतल्यापासून ते आतापर्यंतच्या 25 वर्षात आपण अनेक गोष्टी मिळवल्या असून, काही निराशाजनक गोष्टीही झाल्या. सोनिया गांधींनी यावेळी 2004 आणि 2009 लोकसभा निवडणुकीत मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वात मिळालेला विजय हे पक्षाचं सर्वात मोठं यश होतं असं सांगितलं. 

भारत जोडो यात्रा सध्या महत्त्वाच्या टप्प्यावर असून त्याच्यासह माझी इनिंग संपत आहे याचा मला फार आनंद आहे असं सोनिया गांधी यावेळी म्हणाल्या. सोनिया गांधींनी यावेळी राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचं कौतुक करत शुभेच्छा दिल्या. 

सोनिया गांधींची भाजपावर जोरदार टीका

सोनिया गांधी यांनी भाषणात भाजपावर जोरदार हल्लाबोल केला. घटनात्मक संस्थांवर भाजपा-आरएसएसचा ताबा असून, घटनात्मक मूल्यं पायदळी तुडवली जात आहेत अशी टीका यावेळी सोनिया गांधींनी केली. भारत जोडो यात्रेमुळे लोक जोडले गेले असून, जनतेशी असणारे संबंध पुन्हा दृढ झाल्याचं कौतुक त्यांनी केलं. आज देश आणि काँग्रेससाठी आव्हानात्मक वेळ असल्याचं सोनिया गांधी यांनी म्हटलं. दलित-अल्पसंख्यांकांवर अत्याचार होत असून सरकार काही मोजक्या उद्योगपतींना मदत करत आहे असा आरोप सोनिया गांधींनी केला.