सरकार पाडण्यासाठी भाजपने 100 कोटींची ऑफर दिली होती; आमदाराच्या वक्तव्यानं एकच खळबळ

Karnataka Operation Lotus News: कर्नाटकातील काँग्रेस सरकार अस्थिर करण्यासाठी भाजपकडून प्रय़त्न केले जात असल्याचा दावा काँग्रेसच्या नेत्याने केला आहे. 

मानसी क्षीरसागर | Updated: Aug 26, 2024, 08:58 AM IST
सरकार पाडण्यासाठी भाजपने 100 कोटींची ऑफर दिली होती; आमदाराच्या वक्तव्यानं एकच खळबळ title=
congress mla claims bjp offered rs 100 crore to mlas for opration lotus karnataka

Karnataka Operation Lotus News: कर्नाटकात पुन्हा ऑपरेशन लोटसची चर्चा रंगली आहे. कर्नाटकमध्ये काँग्रेसच्या एका आमदाराने विरोध पक्ष भाजपावर गंभीर आरोप केले आहेत. मुख्यमंत्री सिद्धरमैया यांच्या नेतृत्वातील राज्य सरकार अस्थिर करण्यासाठी ऑपरेशन लोटस घडवण्यात येणार असल्याचा स्फोटक दावा काँग्रेस आमदाराने केला आहे. काँग्रेस आमदाराने रविवारी म्हटलं आहे की, कर्नाटकचे सरकार पाडण्यासाठी भाजपने 100 कोटींची ऑफर दिली होती, असा आरोप त्यांनी केला आहे. मांड्या मतदारसंघाचे काँग्रेस आमदार रविकुमार गौडा यांनी हे आरोप केले आहेत. भाजप आमदारांना आमिष दाखवून सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करत असली तरी कोणताही आमदार त्यांच्या जाळ्यात फसणार नाही राज्यात काँग्रेसचं सरकार स्थिर असेल, असं त्यांनी म्हटलं आहे. 

भाजपवर खळबळजनक आरोप

रविकुमार गौडा यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, भाजप 100 कोटींची ऑफर देत आहे. दोन दिवसापूर्वी मला फोन करून 100 कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली होती. भाजपाला 50 आमदार विकत घ्यायचे आहेत, त्यासाठी मला फोन आला होता पण मी नकार दिला, असा दावा त्यांनी केला आहे. मी याबद्दल ईडीला तक्रार करण्याचा विचार करतोय. आमचं सरकार पाडण्यासाठी योजना बनवत आहेत. 50 कोटी रुपयांवरुन ते आता 100 कोटींची ऑफर देत आहेत. मात्र आमचं सरकार स्थिर आहे, मुख्यमंत्री सक्षम आहेत. 

कर्नाटक सरकार पाडण्यासाठी भाजपच्या वरिष्ठ पातळीवरून प्रयत्न होत आहेत. मला ज्यांनी फोन केला होता त्याची ऑडिओ माझ्याकडे आहे योग्य वेळी ती आम्ही बाहेर काढू, असंही गौडा यांनी म्हटलं आहे. 

दरम्यान, मागील वर्षीय ऑक्टोबरमध्येही गौडा यांनी असाच दावा केला होता. एका टीमने काँग्रेस आमदारांना 50 कोटी रुपये आणि मंत्री पदाचे आमिष दाखवून त्यांच्याकडे वळवण्याचा प्रयत्न केला होता. त्यांनी चार आमदारांसोबत संपर्क साधला होता आणि त्याचे आमच्याकडे पुरावेदेखील आहेत. गौडा यांनी भाजपचे राष्ट्रीय महासचिव बी एल संतोष, केंद्रीय मंत्री शोभा करंदलाजे, प्रल्हाद जोशी आणि एच डी कुमारस्वामी (जनता दल-सेक्युलर) यांच्यावर काँग्रेसचे सरकार अस्थिर करण्यासाठी कट रचत असल्याचा आरोप केला होता.