प्रियंका गांधींऐवजी काँग्रेस नेत्याकडून प्रियांका चोप्राच्या नावाची घोषणाबाजी

घोषणाबाजी करताच उपस्थितांची प्रतिक्रिया पाहण्याजोगी... 

Updated: Dec 2, 2019, 02:44 PM IST
प्रियंका गांधींऐवजी काँग्रेस नेत्याकडून प्रियांका चोप्राच्या नावाची घोषणाबाजी  title=
छाया सौजन्य- एएनआय

नवी दिल्ली : कोणताही राजकीय पक्ष हा त्याच्या नेते आणि कार्यकर्त्यांमुळेही ओळखला जातो. हे कार्यकर्ते आणि नेते असतात, ज्यांच्यामुळे पक्षाला एक वेगळी ओळख मिळते. या कार्यकर्त्यांमध्ये काही इतके उत्साही  असतात की त्यांची चर्चा झाल्यावाचून राहत नाही. सध्या असे एक नेते सर्वांचं लक्ष वेधत आहेत. निमित्त ठरत आहे ते म्हणजे, सोशल मीडियावर व्हायरल होणारा एक व्हिडिओ. 

एएनआय या वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केलेल्या या व्हिडिओमध्ये सुरेंद्र कुमार हे काँग्रेस नेते घोषणाबाजी करताना दिसत आहेत. भाषणादरम्यान, उत्साहाच्या भरात कुमार यांनी सोनिया गांधी जिंदाबाद, राहुल गांधी जिंदाबाद, काँग्रेस जिंदाबाद असं म्हणता म्हणता प्रियंका गांधी जिंदाबाद असं म्हणण्यापूर्वी प्रियांका चोप्रा जिंदाबाद असं म्हटलं आणि तेथे उपस्थितांना यावर काय आरोळी ठोकावी हे कळलंच नाही आणि भाषण करणाऱ्या कुमार यांनाही आपण केलेला सर्व गोंधळ लक्षात आला. 

सोशल मीडियावर हा गोंधळलेल्या काँग्रेस नेत्यांचा व्हिडिओ व्हायरल होताच राजकीय पटलावरील गंभीर वातावरणात काहीशी विनोदी लाट उसळल्याचं पाहायला मिळत आहे. अनेकांनी हा व्हिडिओ शेअरही केला आहे. आता यावर प्रियंका गांधी आणि प्रियांका चोप्रा यांच्या नेमक्या काय प्रतिक्रिया असणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.