कामगार कायदा सुधारणा विधेयकावरुन काँग्रेसची केंद्र सरकारवर टीका

कृषी विधेयकानंतर आता कामगार कायदा सुधारणा विधेयकांवरून केंद्र सरकारला काँग्रेसने घेरले आहे.  

Updated: Sep 24, 2020, 05:06 PM IST
कामगार कायदा सुधारणा विधेयकावरुन काँग्रेसची केंद्र सरकारवर टीका  title=
संग्रहित छाया

नवी दिल्ली : कृषी विधेयकानंतर आता कामगार कायदा सुधारणा विधेयकांवरून केंद्र सरकारला काँग्रेसने घेरले आहे. राज्यसभेत कामगार कायदा सुधारणा विधेयक संमत केल्यावर आता काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी आणि प्रियंका गांधी-वाड्रा यांनी जोरदार टीका केली आहे. शेतकऱ्यांनंतर आता कामगारांना सरकार लक्ष करत असल्याची टीका राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी केली. या संकटाच्या काळात प्रत्येकाचे उदरनिर्वाहाचे साधन सुरू राहील हे पाहणं गरजेचे होते, अशी टीका प्रियंका गांधी यांनी केली आहे. 

कामगार कायद्यात दुरुस्ती करण्याबाबत संसदेत केंद्र सरकारकडून विधेयक मांडण्यात आले. हे विधेयक मंजूर केले गेले. तब्बल १७ वर्षांनी कामगार कायद्यात मोठे बदल करण्यात आले आहेत. ४० हून अधिक कामगार कायद्यांना या चार संहितांमध्ये सामावून घेण्यात आले आहे. यानंतर काँग्रेसने टीका केली आहे.

 

गरिबांचे शोषण, मित्रांचे पोषण, हेच मोदी यांचे शासन आहे, असा हल्लाबोल राहुल गांधी यांनी केला आहे. याबाबत त्यांनी ट्विट केले आहे. संसदेने तीन प्रमुख कामगार सुधारणा विधेयके मंजूर केली आहे. यानुसार कंपनी बंद करण्याच्या मार्गातील अडथळे दूर होतील. तसेच ३०० कर्मचारी असलेल्या कंपन्यांना सरकारच्या परवानगीशिवाय कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढता येणार आहे. आठ खासदारांच्या निलंबनाविरोधात काँग्रेस आणि डाव्या पक्षांसह विरोधी पक्षांनी संसदेच्या कामकाजावर बहिष्कार टाकला असताना राज्यसभेने आवाजीमताने औद्यौगिक संबंध, सामाजिक सुरक्षा आणि व्यवसाय सुरक्षा संबंधित तीन कामगार विधेयकांना मंजुरी दिली. यावरुन काँग्रेसने केंद्र सरकारवर टीका केली.