Rahul Gandhi Disqualified: काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी खासदारकी रद्द झाल्यानंतर ट्विटर अकाऊंटमध्येही बदल केला आहे. राहुल गांधी यांनी ट्विटर बायोत (Twitter Bio) 'Disqualified MP' असा उल्लेख केला आहे. राहुल गांधी यांनी मोदी आडनावावरुन केलेल्या टिप्पणीनंतर सूरत कोर्टाने त्यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली. यानंतर लोकसभा सचिवालयाने नियमानुसार त्यांची खासदारकी रद्द केली आहे. त्यानुसार राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटर बायोत बदल केला आहे.
दरम्यान राहुल गांधींवरील कारवाईच्या निषेधार्थ पक्षाकडून आज एक दिवसीय 'संकल्प सत्याग्रह' केला जात आहे. पक्षाचे कार्यकर्ता संपूर्ण देशभरात आक्रमक झाले असून आंदोलन करत आहेत. दिल्लीतील राजघाट येथे पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतरही सत्याग्रह आंदोलन केलं जात आहे. याशिवाय देशभरात काँग्रेसच्या सर्व जिल्हा मुख्यालयांच्या बाहेर एकदिवसीय सत्याग्रह केला जात आहे.
भाजपाचे नेते राहुल गांधी यांनी माफी मागावी अशी मागणी वारंवार करत आहेत. दरम्यान राहुल गांधी यांनी सावरकरांचा उल्लेख करत आपण गांधी असल्याचं सांगितलं. "माझं नाव सावरकर नाही, गांधी आहे. गांधी कोणाची माफी मागत नाही. संसदेत मी बोलू देण्याची विनंती केली, दोनवेळा पत्र लिहिलं, लोकसभा अध्यक्षांची भेटही घेतली पण काहीच झालं नाही. मग आता कदाचित नरेंद्र मोदींना भेटावं लागेल. ते तर हे होऊ देणारच नाहीत," असं राहुल गांधी पत्रकार परिषदेत म्हणाले.
राहुल गांधी यांनी 2019 मध्ये कर्नाटकमधील एका सभेला संबोधित करताना मोदी आडनावावरुन एक टिप्पणी केली होती. सर्व चोरांचं आडनाव मोदी का असतं? अशी विचारणा राहुल गंधी यांनी केली होती. राहुल गांधींच्या या विधानाविरोधात कोर्टात मानहानीचा खटला दाखल करण्यात आला होता. सूरत कोर्टात झालेल्या सुनावणीत राहुल गांधी यांना दोषी ठरवत दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली.
राहुल गांधी यांना शिक्षा सुनावण्यात आल्याने त्यांच्या खासदारकीवर टांगती तलवार होती. त्यानुसार लोकसभा सचिवालयाने कारवाई करत त्यांची खासदारकी रद्द केली. राहुल गांधी केरळच्या वायनाड येथून लोकसभा खासदार होते. लोकसभेच्या वेबसाईटवरुनही राहुल गांधी यांचं नाव हटवण्यात आलं आहे.