केरळमधील एका महाविद्यालयाची बुरखा घालण्यावर बंदी

देशात पुन्हा एकदा वाद होण्याची शक्यता

Updated: May 2, 2019, 03:46 PM IST
केरळमधील एका महाविद्यालयाची बुरखा घालण्यावर बंदी  title=

तिरुअनंतपूरम : केरळमधील एका महाविद्यालयाने बुरखा घालण्यावर बंदी घातली आहे. महाविद्यालयाच्या आवारात बुरखाबंदी करण्यात आली आहे. संस्थेचे अध्यक्ष डॉ.पी.के.फजल गफुर यांनी ही माहिती दिली आहे. संपूर्ण चेहरा झाकला जाईल अशा बुरख्यावर राज्यातील मल्लपूरम जिल्ह्यातील मुस्लीम एज्युकेशन सोसायटीने बंदी घातली आहे. राज्यात एमईएस ग्रुपच्या विविध शैक्षणिक संस्था आहेत. ज्यामध्ये अभियांत्रिकी आणि वैद्यकीय अभ्यासक्रम देखील आहेत. मात्र,संस्थेच्या या निर्णयामुळे अनेकांच्या भावना दुखावल्या गेल्याची भावना व्यक्त होत आहे.

भारतात गेल्या काही दिवसांपासून बुरख्यावर बंदी घालावी म्हणून काही जणांकडून मागणी होत आहे. शिवसेनेचं मुखपत्र सामनातून देखील बुरख्यावर बंदी घालावी म्हणून एक अग्रलेख आला होता. पण हा अग्रलेख प्रकाशित झाल्यानंतर आरपीआय आणि मुस्लीम धर्मगुरूंनी यावर टीका केली. शिवसेनेच्या या मागणीवर एआयएमआयएम नेते असदुद्दीन ओवैसी यांनी देखील जोरदार आक्षेप घेतला होता.

श्रीलंकेत ईस्टर संडे साजरा होत असताना वेगवेगळ्या ठिकाणी आठ साखळी बॉम्बस्फोट झाले होते. या स्फोटात २५० हून अधिक जणांचा मृत्यू झाला होता. तर ५०० हून अधिक जण जखमी झाले होते. त्यानंतर सुरक्षेच्या दृष्टीने श्रीलंकेत बुरखा आणि नकाबसह चेहरा झाकणाऱ्या प्रत्येक गोष्टींवर बंदी घालण्यात आली आहे.