अरुणाचल प्रदेश आमचा, चीनचा दावा! जिनपिंग भारत दौऱ्यावर येण्याआधीच नवा नकाशा जारी

China New Map Provokes India Again: चीनने जारी केलेल्या या नव्या नकाशामध्ये अरुणाचल प्रदेशबरोबरच अक्साई चीन आणि तैवानवरही चीनने दावा सांगितला असून हे आपलेच भूभाग असल्याचा दावा केला आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Aug 29, 2023, 09:36 AM IST
अरुणाचल प्रदेश आमचा, चीनचा दावा! जिनपिंग भारत दौऱ्यावर येण्याआधीच नवा नकाशा जारी title=
जिनपिंग पुढील काही दिवसांमध्ये जी-20 बैठकीसाठी भारतात येण्याची शक्यता

China New Map Provokes India Again: नवी दिल्लीमध्ये होणाऱ्या जी-20 परिषदेच्या काही दिवस आधीच चीनने आपलं मानक मानचित्र जारी केलं. सोमवारी जारी केलेल्या या पत्रकामध्ये 2023 च्या चीनच्या नकाशात अरुणाचल प्रदेश आणि अक्साई चीनचा प्रांत तसेच तैवान आणि वादग्रस्त दक्षिण चिनी समुद्रातील भाग हा आपल्या ताब्यात असल्याचा दावा केला आहे. चीनने या नव्या नकाशाच्या माध्यमातून या प्रदेशांवर आपला दावा सांगण्याचा प्रयत्न केला आहे. भारताने अनेकदा अरुणाचल प्रदेश हे भारताचे अविभाज्य अंग असून कायम राहणार आहे असं स्पष्ट केलं आहे. चीनचे सरकारी वृत्तपत्र 'ग्लोबल टाइम्स'ने ट्वीटरवर चीनचं 2023 चं मानक मानचित्र शेअर केलं आहे.

कायदेशीर नकाशा असल्याचा दावा

'ग्लोबल टाइम्स'ने दिलेल्या वृत्तानुसार चीनच्या प्राकृतिक संसाधन मंत्रालयाकडून जारी करण्यात आलेलं हे मानक मानचिन्ह आणि चीनचा हा नकाशा मंत्रालयाच्या वेबसाईटवरही दिसत आहे. चीनच्या या नकाशात दिसणाऱ्या राष्ट्रीय सीमा या कायदेशीर बाबी लक्षात घेऊनच दर्शवण्यात आल्याचा दावाही चीनने केली आहे. जोन्हान्सबर्ग येथील ब्रिक्स देशांच्या परिषदेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष क्षी जीनपींग यांनी एकमेकांची भेट घेतल्यानंतर एका आठवड्यामध्येच चीनने नकाशाच्या माध्यमातून भारताला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. या नकाशामध्ये भारताचा काही भाग चिनी भूभाग म्हणून दाखवण्यात आला आहे.

दक्षिण चिनी समुद्रातील भागावरही दावा

नवी दिल्लीमध्ये होणाऱ्या जी-20 शिखर परिषदेसाठी चिनी राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग हे भारत दौऱ्यावर येण्याची दाट शक्यता असून त्याआधीच हा नकाशा जारी करण्यात आला आहे. या नकाशामध्ये केवळ भूभागच नाही तर समुद्रातील सीमाही चीनने वाढवून दाखवल्या आहेत. जगभरामध्ये 9- डॅश लाइन नावाने ओळखली जाणारी चीनची समुद्रातील सीमा ही 1940 च्या दशकामध्ये निश्चित करण्यात आली होती. यू आकारातील ही रेषा दक्षिण चिनी समुद्रातील 90 टक्के भाग चीनचा असल्याचा दावा करते. मात्र चीनचा हा दावा संयुक्त राष्ट्र कनव्हेंशनच्या विरोधात आहे. 

यापूर्वीही केलेला असाच दावा

अशाप्रकारे आजूबाजूच्या देशांचा भूभाग आपलाच असल्याचा दावा करण्याची ही चीनची काही पहिलीच वेळ नाही. भारताच्या कोणत्याही नेत्याने अरुणाचल प्रदेशचा दौरा केला तर चीन त्याला विरोध करतो. याच वर्षी चीनने अरुणाचल प्रदेशमधील 11 जागांना चिनी नावं देत या भूभागावर ताबा सांगितला होता. त्यानंतर भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने चीनला फैलावर घेतलं होतं. बदलेली नावं आणि चीनचा हा दावा भारताला मान्य नाही असं भारताने स्पष्ट केलं होतं. अरुणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य भाग आहे. अशा प्रयत्नांनी वास्तव बदलता येणार नाही, असं भारताने चीनला सांगितलं होतं.