Ayodhya Ram Mandir : अयोध्येतील रामजन्मभूमी मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमंत्रणावरुन राज्यातलं वातावरण तापलं आहे. शिवसेना (यूबीटी) अध्यक्ष उद्धव ठाकरे यांना या सोहळ्यासाठी निमंत्रण देण्यात आले नसल्याने ठाकरे गटाने भाजपवर निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरे यांनीही आपल्याला निमंत्रण मिळाले नसल्याचे म्हटलं आहे. तिथे जाण्यासाठी निमंत्रणाची गरज नाही. रामलल्ला कोणत्याही पक्षाची मालमत्ता नाही, तो सर्वांचा आहे, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. मात्र आता निमंत्रण न मिळाल्याबद्दल उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यावर राम मंदिराचे मुख्य पुजाऱ्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
22 जानेवारीला राम मंदिराचे उद्घाटन होणार आहे. या कार्यक्रमाच्या निमंत्रणावरून राजकीय संघर्ष सुरू झाला आहे. "निमंत्रण न मिळाल्याने उद्धव ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला होता. या घटनेचे राजकारण होऊ नये एवढीच माझी इच्छा आहे. हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे, सरकारने नाही. ज्यांनी बाबरी मशीद पाडली ते आज नाहीत. त्यावेळी शाळेच्या सहलीसाठी अनेकजण तिथे गेले होते. हजारो कारसेवक लढले. त्याबद्दल लालकृष्ण अडवाणी यांचे विशेष आभार. अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांनाही निमंत्रित केले नव्हते असे मी ऐकले आहे," असे उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं.
या विधानावरुन अयोध्या राम मंदिराच्या मुख्य पुजाऱ्यांनी उद्धव ठाकरे यांच्याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. या सोहळ्याची निमंत्रणे फक्त 'राम भक्तांना' पाठवण्यात आली आहेत, असे मंदिराच्या मुख्य पुजाऱ्यांनी म्हटलं आहे. याशिवाय त्यांनी राज्यसभा खासदार संजय राऊत यांच्यावरही निशाणा साधत त्यांच्यावर भगवान रामाचा अपमान केल्याचा आरोप केला आहे.
"जे रामाचे भक्त आहेत त्यांनाच आमंत्रणे पाठवण्यात आली आहेत. भारतीय जनता पक्ष भगवान रामाच्या नावाने लढत आहे, असे म्हणणे पूर्णपणे चुकीचे आहे. आपल्या पंतप्रधानांना सर्वत्र आदर मिळत आहे. त्यांनी आपल्या कार्यकाळात बरीच कामे केली आहेत. हे राजकारण नाही. हे त्याचे समर्पण आहे. 'संजय राऊत यांना इतके दुःख झाले आहे की ते व्यक्तही करू शकत नाहीत. त्यांनीच प्रभू रामाच्या नावाने निवडणूक लढवली होती. जे प्रभू राम मानतात, जे सत्तेत आहेत, ते कसले बकवास बोलत आहेत? ते प्रभू रामाचा अपमान करत आहेत," असे श्री रामजन्मभूमी मंदिराचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांनी म्हटलं आहे.