सुप्रीम कोर्ट आता यापुढे व्हॉट्सअपवर केससंबंधी मेसेज पाठवणार आहे. सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांनी ही माहिती दिली आहे. तसंच वकिलांना दाखल केसेस, सुनावणी होणाऱ्या केसेस यांची व्ह़ॉट्सअपरवर यादी पाठवली जाईल असं त्यांनी सांगितलं आहे. कोर्टात सुनावणी होणाऱ्या प्रकरणांची यादी तयार करण्यात येत असते. यामुळे त्या संबंधित दिवशी नेमकी कोणती प्रकरणं सुनावणीसाठी आहेत हे आधीच वकिलांना समजेल.
"75 व्या वर्षी सुप्रीम कोर्टाने एक छोटं पाऊल टाकलं असून मोहीम सुरु केली आहे. याचा मोठा प्रभाव पडण्याची क्षमता आहे. व्हॉट्सअप मेसेंजर हा आपल्या दैनंदिन जीवनातील शक्तिशाली सेवा असून, संवादाचं प्रबळ माध्यम ठरलं आहे. न्याय मिळण्याचा अधिकार अधिक बळकट करण्यासाठी आणि न्यायव्यवस्थेत पारदर्शकता वाढवण्यासाठी, सर्वोच्च न्यायालयाने Whatsapp मेसेजिंग सेवा त्याच्या IT सेवांसोबत एकत्रित करण्याची घोषणा केली आहे," अशी माहिती सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांनी दिली आहे.
न्यायमूर्ती चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील नऊ न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर याचिकांमुळे उद्भवलेल्या एका जटिल कायदेशीर प्रश्नावर सुनावणी सुरू होण्यापूर्वी, सरन्यायाधीशांनी ही घोषणा केली. आता वकिलांना केस दाखल करण्याबाबत स्वयंचलित संदेश प्राप्त होतील. याव्यतिरिक्त, बारच्या सदस्यांना त्यांच्या मोबाईल फोनवर ज्या प्रकरणांवर सुनावणी होणार आहे त्याची यादी प्रकाशित होताच प्राप्त होईल.
न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी सांगितलं आहे की, "ही सुविधा आणि सेवा आपल्या रोजच्या कामाच्या सवयींमध्ये मोठा बदल आणेल. तसंच यामुळे कागदाचा आणि आपल्या पृथ्वीला वाचवता येईल". सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी या निर्णयावर व्यक्त होताना हा आणखी एक क्रांतीकारक निर्णय असल्याचं सांगितलं आहे.
न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी सुप्रीम कोर्टाचा अधिकृत व्हॉट्सॲप नंबर देखील शेअर केला असून यावर कोणताही संदेश किंवा कॉल स्वीकारणार नाही हे स्पष्ट केलं आहे. "सरन्यायाधीशांनी सर्वोच्च न्यायालयाचा अधिकृत व्हॉट्सॲप नंबर दिला असून संदेश किंवा कॉल स्वीकारणार नाही हे स्पष्ट केलं आहे," अशी माहिती तुषार मेहता यांनी दिली.