नवी दिल्ली : शेतक-यांना केंद्र सरकारनं मोठा दिलासा दिलाय. केंद्र सरकारनं कांद्यावरील निर्यात मूल्य पूर्णपणे हटवलंय. कांद्यावर ७०० डॉलर्स प्रति टन इतकं किमान निर्यात मूल्य लावण्यात आलं होत. त्यामुळे कांद्याची निर्यात अशक्य झाली होती. दर घसरणीनंतर अखेर कांदा निर्यात खुली करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतलाय.
बाजारात कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली होती. इतर राज्यातील आवक वाढल्यानं लासलगाव बाजारपेठेत कांदा ९०० रुपयांनी कोसळला होता.. त्यामुळे निर्यात मूल्य हटवण्याच्या मागणीनं जोर धरला होता. आता निर्यात खुली झाल्यानं कांद्याचे दर स्थिर व्हायला मदत होणार आहे.
भारत सर्वात मोठा कांदा निर्यातदार देश आहे. बांग्लादेश, मलेशिया, श्रीलंका, यूएई या देशात मोठ्या प्रमाणात भारतातून कांद्याची निर्यात होते. किमान निर्यात मूल्य हटवल्याने या देशांनाही फायदा होणार आहे.. दरम्यान कांद्याचे निर्यातमुल्य शून्य डॉलरपर्यंत आणले तरीही कांद्याच्या घसरलेल्या बाजारभावात काहीही सुधारणा होणार नसल्याची भिती शेतकरी व्यक्त करीत आहेत. तर बाजार समिती प्रशासनाला मात्र या निर्यातशुल्क शुन्यावर आणल्यामुळे कांद्याचे बाजारभाव वाढतील अशी आशा वाटत आहे.
दरम्यान, केंद्र सरकारने कांद्याचे निर्यातमूल्य शून्य डॉलरपर्यंत आणल्यामुळे कांद्याच्या घसरलेल्या बाजारभावाला थोडाफार आधार मिळाला आहे, कांद्याच्या दरामध्ये कालच्या तुलनेत तीनशे ते साडेतीनशे रुपयांच्या आसपास वाढ दिसून आली आहे. येवला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला १९०० रुपये प्रति क्विंटल इतका कमाल दर मिळाला तर काल हाच कमाल दर येवला १५५० च्या दरम्यान होता.