जयंती नटराजन यांच्या निवासस्थानी CBIची धाड

माजी पर्यावरण मंत्री जयंती नटराजन यांच्या चेन्नईतील निवासस्थानी धाड टाकल्याची माहिती समोर येत आहे.

Sunil Desale Sunil Desale | Updated: Sep 9, 2017, 09:29 PM IST
जयंती नटराजन यांच्या निवासस्थानी CBIची धाड  title=

नवी दिल्ली : माजी पर्यावरण मंत्री जयंती नटराजन यांच्या चेन्नईतील निवासस्थानी धाड टाकल्याची माहिती समोर येत आहे.

जयंती नटराजन या मंत्री असताना एका प्रकरणात जमिनीसंदर्भातील पर्यावरण मंजुरी देताना नियम धाब्यावर बसवल्याचा आरोप आहे. जयंती नटराजन यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करून नियमबाह्यपणे वनजमिनीत उत्खननास मंजुरी दिल्याचा आरोप त्यांच्याविरोधात दाखल तक्रारीत करण्यात आला आहे.

दाखल करण्यात आलेल्या तक्रारीनुसार, जयंती नटराजन यांच्यासोबतच इलेक्ट्रोस्टील कास्टिंग लिमिटेड कंपनीचे तत्कालीन संचालक उमंग केजरीवाल आणि अन्य काही जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच याच गुन्ह्याच्या आधारे सीबीआयने आज धाडी टाकल्या आहेत.

२०१२ साली वन संरक्षण अधिनियमाचं कथित स्वरुपात उल्लंघन करत इलेक्ट्रोस्टील कास्टिंग लिमिटेड या कंपनीला झारखंडमध्ये वन जमिनीवर उत्खननास मंजुरी दिली होती. झारखंडमधील सारडा वनक्षेत्रात केंद्रीय पर्यावरण राज्यमंत्र्यांनी या उत्खननास मनाई केली होती मात्र नटराजन यांनी वनक्षेत्रात उत्खननास मंजुरी दिली.

या प्रकरणी सीबीआयने चेन्नई, दिल्ली, कोलकाता, रांची आणि ओडिशातील सुंदरगड येथील संबंधितांच्या ठिकाणांवर धाडी टाकल्या आहेत.