'सीबीआय आणि ईडी हे तर भाजपचे मित्रपक्ष- तेजस्वी यादव

सपा आणि बसपाच्या युतीमुळे मोदींचा पराभव निश्चित

Updated: Jan 14, 2019, 03:43 PM IST
'सीबीआय आणि ईडी हे तर भाजपचे मित्रपक्ष- तेजस्वी यादव title=

लखनऊ: उत्तर प्रदेशातील समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षाची युती नरेंद्र मोदी यांचा पराभव करायला पुरेशी आहे, असा दावा राष्ट्रीय जनता दलाचे (राजद) नेते तेजस्वी यादव यांनी केला. ते सोमवारी लखनऊ येथील कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी सपा आणि बसपाने घेतलेल्या युतीच्या निर्णयाचे जोरदार स्वागत केले. राष्ट्रहित डोळ्यासमोर ठेवून अखिलेश यादव आणि मायावती यांनी युतीचा निर्णय घेतला त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. सद्य परिस्थितीत ही युती होणे खूप महत्त्वाचे होते. स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटीशांची गुलामी करण्यात धन्यता मानणारे लोक सध्या सत्तेत आहेत. मात्र, सपा-बसपा ही युती नरेंद्र मोदींचा सहजपणे पराभव करेल. काही महिन्यांपूर्वी झालेल्या पोटनिवडणुकांवेळी त्याचे संकेत मिळाले होते. राहुल गांधी यांनीदेखील सपा-बसपाच्या युतीचे स्वागत केले होते. किंबहुना उत्तर प्रदेशात कोणाची युती आहे, हे फारसे महत्त्वाचे नाही. परंतु, भाजपला याठिकाणी विजय मिळणार नाही, असे राहुल यांनी म्हटल्याचे तेजस्वी यांनी निदर्शनास आणून दिले. 

याशिवाय, तेजस्वी यादव यांनी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग (सीबीआय) आणि अंमलबजावणी संचलनालय (ईडी) या संस्थांच्या कारभारावरही टीका केली. सीबीआय आणि ईडी या तपासयंत्रणा राहिल्या नसून त्या भाजपच्या मित्रपक्ष झाल्या आहेत. लालूप्रसाद यादव यांना त्यामुळेच तुरुंगात जावे लागले. कारण, नरेंद्र मोदी यांना लालूप्रसाद यादव यांच्यापासून धोका वाटत होता, असे तेजस्वी यादव यांनी म्हटले. 

दरम्यान, उत्तर प्रदेशनंतर बिहारमध्येही काँग्रेसला एकट्यानेच लढावे लागण्याची शक्यता आहे. तेजस्वी यादव यांनी सोमवारी लखनऊमध्ये अखिलेश यादव यांची भेट घेतल्यामुळे ही शक्यता वाढली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, बिहारमधील लोकसभेच्या ४० जागांपैकी महाआघाडीमध्ये काँग्रेस १६ जागांची मागणी करत आहे. पण राजद केवळ १० जागा सोडायलाच तयार आहे.