बुराडी प्रकरणात धक्कादायक खुलासा, 11 जणांचा मृत्यू 'आत्महत्या' नव्हत्या

मनोवैज्ञानिक ऑटोप्सीमध्ये मृताच्या मृत्यूपूर्वी त्याची मानसिक अवस्थेचं आकलन केलं जातं

Updated: Sep 15, 2018, 12:16 PM IST
बुराडी प्रकरणात धक्कादायक खुलासा, 11 जणांचा मृत्यू 'आत्महत्या' नव्हत्या title=

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीच्या बुराडी भागात एकाच कुटुंबातील 11 जणांच्या मृत्यू प्रकरणात महत्त्वाचा खुलासा झालाय. शुक्रवारी दिल्ली पोलिसांना मनोवैज्ञानिक ऑटोप्सी रिपोर्ट मिळालाय. यामध्ये 11 जणांचा मृत्यू हा 'आत्महत्या' नसल्याचं म्हटलंय. परंतु, अंधश्रद्धेपोटी एक विधी करत असताना झालेल्या दुर्घटनेत हे सर्व जण ठार झाल्याचं म्हटलंय. दिल्ली पोलिसांनी जुलै महिन्यात सीबीआयला सायकोलॉजिकल ऑटोप्सी करण्याची विनंती केली होती. 

आत्महत्या करण्याचं कुणाच्याही ध्यानी-मनी नव्हतं 

मिळालेल्या अहवालानुसार, मृतांच्या मनोवैज्ञानिक ऑटोप्सीच्या अभ्यासानुसार ही घटना म्हणजे आत्महत्या नव्हे तर दुर्घटना होती. मृतांपैंकी एकाही सदस्याच्या ध्यानी-मनीही आत्महत्येचा विचार नव्हता. 

मनोवैज्ञानिकांच्या अभ्यासादरम्यान सीबीआयच्या फॉरेन्सिक विज्ञान प्रयोगशाळेनं (CFSL) घरात सापडलेल्या रजिस्टरमध्ये लिहिलेल्या गोष्टींचं आणि पोलिसांनी नोंदविलेल्या चुंडावत कुटुंबाचे इतर सदस्य आणि मित्रमंडळींच्या जबाबांचं विश्लेषण केलंय. 

CFSL नं चुंडाव कुटुंबातील सर्वात मोठे सदस्य दिनेश सिंह चुंडावत आणि त्यांची बहिण सुजाता नागपाल आणि इतर मंडळींचीही चौकशी केली होती.

मनोवैज्ञानिक ऑटोप्सीमध्ये मृताच्या मृत्यूपूर्वी त्याची मानसिक अवस्थेचं आकलन करून त्या व्यक्तीच्या मानसिक स्थिती माहीत करून घेण्याचा प्रयत्न केला होतो.