दिव्या पाहुजा हत्या प्रकरणाला मोठं वळण; पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून धक्कादायक खुलासा

मॉडेल दिव्या पाहुजा प्रकरणी पोलिसांच्या हाती मोठं यश आलं आहे. पोलिसांना हरियाणाच्या फतेहबाद येथील भाकरा कॅनलमध्ये दिव्याचा मृतदेह सापडला आहे. दरम्यान शवविच्छेदन केलं असता नवी माहिती हाती आली आहे.   

शिवराज यादव | Updated: Jan 15, 2024, 06:03 PM IST
दिव्या पाहुजा हत्या प्रकरणाला मोठं वळण; पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून धक्कादायक खुलासा title=

मॉडेल दिव्या पाहुजा मर्डर प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलिसांच्या हाती मोठं यश आलं आहे. पोलिसांना फतेहबाद येथील भाकरा कॅनलमध्ये दिव्याचा मृतदेह सापडला आहे. दरम्यान मृतदेह सापडल्यानंतर दुसऱ्या दिवशी शवविच्छेदन अहवालातून काही खुलासे झाले आहेत. रविवारी हरियाणाच्या हिसार येथील सरकारी रुग्णालयात चार डॉक्टरांच्या टीमने हे शवविच्छेदन केलं. 

पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराज अग्रसेन मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली चार डॉक्टरांच्या पथकाने हे शवविच्छेदन केलं. यावेळी दिव्याच्या डोक्यात एक बुलेट सापडली आहे. यादरम्यान तोहाना आणि गुरुग्रामचे पोलीस अधिकारीही उपस्थित होते.  

"शवविच्छेदन करताना संपूर्ण प्रक्रियेचा व्हिडीओ शूट करण्यात आला आहे. तिच्या डोक्यात एक बुलेट सापडली आहे. करनालच्या मधुबन येथे ती फॉरेन्सिकसाठी पाठवण्यात आली आहे. शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबाला सोपवण्यात आला आहे," अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. दिव्या पाहुजाच्या कुटुंबाने अंत्यसंस्कारासाठी मृतदेह गुरुग्रामला नेला असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. 

कुख्यात गुंड संदीप गडोलीच्या कथित बनावट चकमकीत आरोपी असलेल्या दिव्या पाहुजाची 2 जानेवारीला गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. दिव्या शहरातील हॉटेल मालक अभिजीत सिंगला ब्लॅकमेल करत होती, ज्याने तिची आपल्या मालकीच्या एका ठिकाणी गोळ्या झाडून हत्या केली होती असं पोलिसांनी सांगितलं आहे. 

पोलिसांनी याप्रकरणी हॉटेल मालक आणि इतर तिघांना अटक केली आहे. परंतु मुख्य आरोपीचे दोन सहकारी बलराज गिल आणि रवी बांद्रा मृतदेहासह गुरुग्राममधून पळून गेले होते. बलराज गिलला 11 जानेवारी रोजी कोलकाता विमानतळावरून पकडण्यात आलं. पोलिसांनी कसून चौकशी केली असता त्याने आपण रवीसह मृतदेह भाकरा येथील कालव्यात फेकून दिल्याची माहिती दिली होती. 

पाहुजाचा मृतदेह शनिवारी तोहाना येथील कालव्यातून बाहेर काढण्यात आला. पोलिसांनी 42 गोताखोरांच्या मदतीने अखेर मृतदेहाचा शोध लावला. थंडीमुळे मृतदेह कुजला नव्हता. दोन टॅटूंच्या मदतीने मृतदेहाची ओळख पटवण्यात आला. दरम्यान रवी बांद्रा अद्याप फरार आहे.