कुमारस्वामींचे सरकार कोसळल्यानंतर मायावतींकडून बसपाच्या एकमेव आमदाराची हकालपट्टी

ते आज विश्वासदर्शक ठरावावरील मतदानावेळी गैरहजर होते.

Updated: Jul 23, 2019, 11:44 PM IST
कुमारस्वामींचे सरकार कोसळल्यानंतर मायावतींकडून बसपाच्या एकमेव आमदाराची हकालपट्टी title=

बंगळुरू: काँग्रेस आणि धर्मनिरपेक्ष जनता दलाच्या (जेडीएस) आमदारांच्या बंडखोरी नाट्यानंतर मंगळवारी कर्नाटक विधानसभेत विश्वासदर्शक ठरावावर मतदान घेण्यात आले. यामध्ये ९९ विरुद्ध १०५ अशा मतांनी कुमारस्वामी सरकारचा पराभव झाला. यानंतर बसपा प्रमुख मायावती यांनी कर्नाटकातील आपल्या एकमेव आमदाराला पक्षातून निलंबित केले. एन. महेश हे बसपाचे आमदार आहेत. ते आज विश्वासदर्शक ठरावावरील मतदानावेळी गैरहजर होते. यानंतर पक्षाकडून त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली.

मायावती यांनी ट्विटरवरून यासंदर्भात माहिती दिली. यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, एन.महेश यांनी विश्वासदर्शत ठरावावरील मतदानावेळी कुमारस्वामी सरकारच्या बाजूने मतदान करण्याच्या पक्षादेशाचे उल्लंघन केले. ते यावेळी सभागृहात उपस्थित नव्हते. पक्षाने ही गोष्ट गांभीर्याने घेतली असून त्यांना तातडीने बडतर्फ करण्यात येत असल्याचे मायावती यांनी सांगितले. 

२२४ जागांच्या कर्नाटक विधानसभेत काँग्रेस-जेडीएस यांनी युती करून सरकार स्थापन केले होते. त्यामुळे निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष ठरुनही भाजपला सत्तेपासून दूर राहावे लागले होते. मात्र, काही दिवसांपूर्वी काँग्रेस-जेडीएसच्या १६ आमदारांनी बंडखोरी केली होती. त्यामुळे कुमारस्वामी सरकारला बहुमत गमवावे लागले.