नवी दिल्ली : केंद्र सरकारतर्फे कॅशलेस व्यवहाराला प्रोत्साहन देण्यासाठी नव्या योजना कार्यान्वित करण्यात येत आहेत. त्यानंतर आता भारतीय रेल्वेने कॅशलेस तिकीटाला प्रोत्साहन देण्यासाठी नवी योजना सुरु केली आहे.
रेल्वेच्या नव्या स्कीममध्ये आता तुम्ही भीम अॅपच्या माध्यमातून तिकीट बुकिंग करु शकता. यासाठी तुम्हाला डेबिट किंवा क्रेडिट कार्ड सोबत ठेवण्याची गरज नाहीये.
भीम अॅपवरुन तिकीट बुक करण्यासाठी तुम्हाला तुमच्या स्मार्टफोनमध्ये भीम अॅप डाऊनलोड करावं लगाणार आहे. हे अॅप गुगल प्ले स्टोअरवरुन तुम्ही फ्रीमध्ये डाऊनलोड करु शकता. या अॅपच्या माध्यमातून बुकींग केल्यास रेल्वेतर्फे तुम्हाला एक खास ऑफर देण्यात येत आहे. तसेच यासोबत एक ऑफर फ्रीमध्ये प्रवास करण्याचीही आहे.
भारतीय रेल्वेने १ ऑक्टोबरपासून लकी ड्रॉ स्कीम चालू केली आहे. ही स्कीम प्रत्येक महिन्यात चालवण्यात येते. या स्कीमनुसार तुम्ही भीम अॅप किंवा युपीआय अॅपवरुन पेमेंट कराल तर तुम्हाला फ्रीमध्ये प्रवास करण्याची संधी मिळणार आहे. मात्र, यासाठी काही नियम आणि अटी ठेवण्यात आल्या आहेत.
या स्कीमनुसार, प्रत्येक महिन्याला ५ प्रवाशांना फ्रीमध्ये प्रवास करण्याची संधी मिळणार आहे. भीम किंवा युपीआय अॅपवरुन पेमेंट करणाऱ्यांपैकी ५ भाग्यवान विजेत्यांना ही संधी मिळणार आहे. ही निवड कम्प्युटरच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. या स्कीममधील विजेत्यांना त्यांच्या तिकीटाचे पैसे पुन्हा दिले जाणार आहेत. म्हणजेच त्यांचा रेल्वे प्रवास अगदी मोफत होणार आहे.
रेल्वेने सुरु केलेली ही योजना ३१ मार्चपर्यंत सुरु राहणार आहे. स्कीममधील पहिली अट म्हणजे तुम्ही भीम अॅपद्वारे रेल्वे तिकीट बुक केल्यानंतर ज्या महिन्यात तुम्ही विजेता घोषित करण्यात येईल त्याच महिन्यात तुम्हाला प्रवास करावा लागणार आहे. प्रत्येक महिन्याला विजेता ठरणाऱ्यांची नावे IRCTCच्या वेबसाईटवर जाहीर करण्यात येतील. विजेत्यांना ई-मेलच्या माध्यमातूनही कळविण्यात येणार आहे.
सर्वप्रथम भीम अॅप तुमच्या स्मार्टफोनमध्ये डाऊनलोड करा. त्यानंतर आपल्या बँक अकाऊंटसोबत लिंक करा. मग, तिकीट बुकिंगचं पेमेंट भीम अॅपच्या माध्यमातून तुम्ही करु शकता.
भीम अॅपच्या माध्यमातून पेमेंट केल्यास तुम्हाला कुठल्याही प्रकारचं अतिरिक्त शुल्क द्याव लागणार नाहीये. तुमची बँक युपीआय किंवा आयएमपीएस शुल्क घेऊ शकते. हे अॅप वापरण्यासाठी नेट बँकिंगचीही आवश्यकता नाहीये.