Bombay High Court on Act of God: टायर फुटल्याने (Tyre Burst) तरुणाचा मृत्यू झाल्याप्रकरणी मुंबई हायकोर्टाने (Bombay High Court) मोठा निर्णय सुनावला आहे. विमा कंपनीने (Insurance Company) ही दैवी घटना (Act of God) आहे सांगत पीडित तरुणाच्या कुटुंबाला पैसे देण्यास नकार दिला होता. विमा कंपनीने याप्रकरणी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती. दरम्यान कोर्टाने विमा कंपनीला दणका दिला असून टायर फुटणं ही दैवी घटना नसून, बेजबाबदारपणा आहे अशा शब्दांत कोर्टाने कंपनीला खडसावलं. यासह कोर्टाने मृत तरुणाच्या कुटुंबाला 1 कोटी 25 लाखांची नुकसान भरपाई देण्याचा आदेश दिला आहे.
25 ऑक्टोबर 2010 रोजी मकरंद पटवर्धन (Makarand Patwardhan) आपल्या दोन मित्रासंह पुण्याहून मुंबईला जात असताना झालेल्या दुर्घटनेत त्यांनी जीव गमावला होता. कारचा मागील टायर फुटल्याने त्यांचं कारवरील नियंत्रण सुटलं आणि कार दरीत जाऊन कोसळली होती. यानंतर मकरंद पटवर्धन यांनी जागीच जीव गमावला होता.
याप्रकरणी मुंबई हायकोर्टात दाखल याचिकेवर सुनावणी झाली असताना हायकोर्टाने विमा कंपनीला खडे बोल सुनावले. 'न्यू इंडिया अॅश्युरन्स कंपनी लिमिटेड'ने मोटार अपघात दावा न्यायाधिकरणाच्या २०१६ च्या निर्णयाविरुद्ध दाखल केलेली याचिका हायकोर्टाचे न्यायमूर्ती एसजी डिगे यांच्या एकल खंडपीठाने फेटाळून लावली.
मकरंद यांचं कुटुंब त्यांच्यावर अवलंबून होतं, घरात ते एकमेव कमावते होते याकडेही हायकोर्टाने लक्ष वेधलं. विमा कंपनीने आपल्या याचिकेत नुकसान भरपाईची रक्कम जास्त असल्याचं सांगत ही दुर्घटना दैवी असल्याचा उल्लेख केला होता. हायकोर्टाने मात्र विमा कंपनीचा हा युक्तिवाद फेटाळून लावला.
नैसर्गिक संकट असेल तरच त्याला दैवी घटना म्हटलं जाऊ शकतं. ज्यासाठी माणूस जबाबदार नसतो. पण टायर फुटणं ही दैवी घटना म्हणू शकत नाही. माणसाकडून झालेले हे दुर्लक्ष आणि बेजबाबदारपणा आहे असं कोर्टाने आदेशात सांगितलं. तसंच टायर फुटण्यासाठी तापमान, वेग, कमी हवा, जास्त हवा, सेकंड हॅण्ड टायर अशी अनेक कारणं असू शकतात असं कोर्टाने म्हटलं.
हायकोर्टाच्या निर्णयामुळे मकरंद पटवर्धन यांच्या कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान कोर्टाने यावेळी वाहनचालकाने प्रवास सुरु कऱण्याआधी टायरलमधील हवा तसंच इतर गोष्टी तपासून घ्याव्यात असा सल्लाही दिला आहे.