Chandra Grahan 2022: 16 मे ला चंद्रग्रहणाच्या दिवशी दिसणार Blood Moon, जाणून घ्या कधी आणि कसे पाहाल?

वर्षातील पहिले चंद्रग्रहण केव्हा, कुठे आणि कसे दिसेल आणि 16 मे रोजी ब्लड मून कसा दिसेल हे जाणून घेऊया. 

Updated: May 15, 2022, 08:08 PM IST
Chandra Grahan 2022: 16 मे ला चंद्रग्रहणाच्या दिवशी दिसणार Blood Moon, जाणून घ्या कधी आणि कसे पाहाल?  title=

मुंबई : यंदाच्या वर्षातलं पहिलं चंद्रग्रहण (Chandra Grahan) 16 मे दिवशी दिसणार आहे. बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी चंद्रग्रहण होत आहे. हे संपूर्ण चंद्रग्रहण असेल जे जगभरातील अनेक देशांमध्ये दिसणार आहे. शास्त्रज्ञ याला 'ब्लड मून' Blood Moon) असेही संबोधत आहेत. वर्षातील पहिले चंद्रग्रहण केव्हा, कुठे आणि कसे दिसेल आणि 16 मे रोजी ब्लड मून कसा दिसेल हे जाणून घेऊया. 

आकाशातील अशा या अदभूत घटनांकडे डोळे लावून बसणार्‍या खगोलप्रेमींसाठी 16 मे ही तारीख यंदा खास ठरणार आहे. भारतात ग्रहण ही केवळ खगोलीय घटना म्हणून पाहून सोडलं जात नाही. त्यासोबतीने काही धार्मिक रिती-रिवाज पाळले जातात. 16 मेच्या चंद्रग्रहणाच्या निमित्ताने खगोलप्रेमींना 2022 मधील पहिल्या ब्लड मूनचं (Blood Moon) देखील दर्शन घडणार आहे. 

चंद्रग्रहण कधी दिसणार?
भारतीय वेळेनुसार, वर्षातील पहिले चंद्रग्रहण सोमवार, 16 मे 2022 रोजी सकाळी 07:02 पासून सुरू होऊन दुपारी 12.20 पर्यंत दिसेल. या चंद्रग्रहणाचा एकूण कालावधी सुमारे 5 तास 54 मिनिटे असेल.

कुठे दिसणार चंद्रग्रहण? 
वर्षातील पहिले चंद्रग्रहण भारतात दिसणार नाही. त्यामुळे येथे सुतक काळही वैध ठरणार नाही. शास्त्रज्ञांच्या मते, वर्षातील पहिले चंद्रग्रहण अंटार्क्टिका आणि आशियातील काही ठिकाणांसह युरोप, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, पॅसिफिक, अटलांटिक आणि हिंदी महासागराच्या नैऋत्य भागातून दिसणार आहे.

चंद्रग्रहण कसे पाहू शकता? 
हे चंद्रग्रहण भारतात दिसणार नाही. पण जर तुम्हाला ही खगोलीय घटना पाहायची असेल तर 16 मे रोजी तुम्ही यूएस स्पेस एजन्सी नासाच्या अधिकृत यूट्यूब चॅनेलला भेट देऊन पाहू शकता. किंवा नासाच्या वेबसाईटला भेट देऊ शकता. 

ब्लड मून कसा दिसेल? 
जेव्हा पृथ्वी सूर्य आणि चंद्राच्या मध्ये येते तेव्हा चंद्रग्रहण होते. या स्थितीत पृथ्वीची सावली चंद्राच्या प्रकाशाला व्यापते. जेव्हा सूर्यप्रकाश पृथ्वीच्या काठावरुन चंद्रावर पोहोचतो तेव्हा त्याचे निळे आणि हिरवे रंग वातावरणात विखुरले जातात, कारण त्यांची तरंगलांबी कमी असते. तर लाल रंगाची तरंगलांबी जास्त असते आणि ती चंद्रापर्यंत पोहोचू शकते. अशा स्थितीत चंद्र लाल दिसू लागतो. त्याला ब्लड मून म्हणतात.