खा. साबळेंच्या आरोपाने हादरली दलित चळवळ

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विरोधात उभा राहण्यासाठी दलित संघटनांना नक्षलवादी मदत करत असल्याचा खळबळजनक आरोप भाजप खासदार अमर साबळे यांनी केला आहे. साबळे यांच्या विधानामुळे दलित चळवळीत एकच खळबळ उडाली असून, तीव्र संतापही व्यक्त केला जात आहे.

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Sep 3, 2017, 01:28 PM IST
खा. साबळेंच्या आरोपाने हादरली दलित चळवळ title=

मुंबई : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विरोधात उभा राहण्यासाठी दलित संघटनांना नक्षलवादी मदत करत असल्याचा खळबळजनक आरोप भाजप खासदार अमर साबळे यांनी केला आहे. साबळे यांच्या विधानामुळे दलित चळवळीत एकच खळबळ उडाली असून, तीव्र संतापही व्यक्त केला जात आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील विविध राज्यांमधील पक्ष खासदारांच्या बैठका घेतल्या. यात महाराष्ट्र आणि गोव्यातील खासदारांची बैठकही मोदींनी घेतली. या बैठकीत खासदारांनी मतदारसंघ आणि राज्यासमोरील प्रश्न पंतप्रधानांसमोर मांडले. दरम्यान, ही चर्चा सुरू असताना खा. अमर साबळे यांनी दलित संघटना आणि नक्षलवादी हा विषय अचानक उपस्थित केला. ज्यामुळे उपस्थित खासदारही अवाक झाले. दै. लोकसत्ताने याबाबत वृत्त दिले असून, या वृत्तात खा. साबळे यांनी 'आंबेडकरी चळवळीतील एका नेत्याचे नक्षलवाद्यांशी संबंध असून, ते सातत्याने संघ व भाजपच्या विरोधात प्रचार करीत असल्याचे विधान केल्याचे कळते', असे म्हटले आहे.

दरम्यान, भारिप -बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी खा. साबळे यांचा आरोप फेटाळून लावलत 'साबळेंच्या आडून आंबेडकरी चळवळीला बदनाम करण्याचा हा भाजप व संघाचा कट असल्याचे', म्हटले आहे. 
दरम्यान, या प्रकारामुळे येत्या काळात दलित चळवळ विरूद्ध भाजप, तसेच भाजपशी संबंधीत सर्व संघटना, असा वाद रंगण्याची शक्यता आहे.