#DelhiResults2020: भाजप नेत्यांनी चिथावणीखोर वक्तव्ये केलेल्या मतदारसंघांचा निकाल काय?

यंदाची दिल्ली विधानसभा निवडणूक ही टोकाचा धार्मिक प्रचार आणि विखारी वक्तव्यांमुळे अधिक गाजली.

Updated: Feb 11, 2020, 06:57 PM IST
#DelhiResults2020: भाजप नेत्यांनी चिथावणीखोर वक्तव्ये केलेल्या मतदारसंघांचा निकाल काय? title=

नवी दिल्ली: यंदाची दिल्ली विधानसभा निवडणूक ही टोकाचा धार्मिक प्रचार आणि विखारी वक्तव्यांमुळे अधिक गाजली. संपूर्ण प्रचाराच्या काळात भाजपच्या अनेक नेत्यांनी चिथावणीखोर आणि आक्षेपार्ह वक्तव्ये केली. मात्र, यापैकी भाजप खासदार अनुराग ठाकूर आणि परवेश साहिब सिंग यांची वक्तव्यांची सर्वाधिक चर्चा झाली. परंतु, मंगळवारी जाहीर झालेल्या निकाल जाहीर झाल्यानंतर भाजप नेत्यांनी चिथावणीखोर वक्तव्ये केलेल्या मतदारसंघांमध्ये आम आदमी पक्षाला (आप) मोठे यश मिळताना दिसले. 

यापैकी रिठाला विधानसभा मतदारसंघात भाजपचे केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी 'देश के गद्दारोंको.... गोली मारो', असे वक्तव्य केले होते. यानंतर निवडणूक आयोगाने ठाकूर यांना प्रचार करण्यास बंदीही केली होती. याच रिठाला मतदारसंघात 'आप'च्या महिंदर गोयल यांनी भाजपच्या मनिष चौधरी यांचा १३,९९४ मतांना पराभव केला. 

यानंतर परवेश साहिब सिंह यांनी विकासपुरी मतदारसंघात केलेले वक्तव्यही चांगलेच गाजले होते. दिल्लीत 'आप'ची सत्ता आल्यास तुमच्या बहिणी आणि मुलींवर घरात घुसून बलात्कार केले जातील, असे परवेश सिंह यांनी म्हटले होते. या मतदारसंघातही भाजपचा दणदणीत पराभव होण्याची चिन्हे आहेत. आतापर्यंतच्या निकालांनुसार भाजपचे उमेदवार संजय सिंह 'आप'च्या महिंदर यादव यांच्यापेक्षा तब्बल ३१ हजार मतांनी पिछाडीवर आहेत. 

तर मदीपूर मतदारसंघात झालेल्या प्रचारसभेत 'आप'चे सर्वेसर्वा आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना भाजपच्या नेत्यांनी दहशतवादी संबोधले होते. याठिकाणी भाजपच्या उमेदवाराचा २२,७५३ मतांनी पराभव झाला. तर भाजपचे फायरब्रँड नेते म्हणून ओळख असलेल्या तेजिंदर सिंह बग्गा यांचाही हरी नगर मतदारसंघात दणदणीत पराभव झाला आहे. 'आप'च्या राज कुमारी ढिल्लॉ यांनी त्यांचा तब्बल १७ हजार मतांनी पराभव केला. 

सध्या भाजपाचे ३४ उमेदवार विजयी झाले असून २९ उमेदवार आघाडीवर आहेत. 'आप'ने २०१५ च्या कामगिरीची पुनरावृत्ती केली आहे. त्यामुळे भाजपाला पुन्हा एकदा दुहेरी आकडा गाठण्यातही अपयश येताना दिसत आहे.