दिल्लीतील पराभवानंतर मनोज तिवारी म्हणतात...

भाजप ४८ पेक्षा जास्त जागा जिंकून दिल्लीत सरकार स्थापन करेल, असे तिवारी यांनी म्हटले होते. 

Updated: Feb 11, 2020, 06:03 PM IST
दिल्लीतील पराभवानंतर मनोज तिवारी म्हणतात... title=

नवी दिल्ली: दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या मंगळवारी जाहीर झालेल्या निकालांमध्ये आम आदमी पक्षाने (आप) भाजप आणि काँग्रेसला अक्षरश: धूळ चारली. आतापर्यंत हाती आलेल्या निकालांनुसार आम आदमी पक्ष ६३ जागांवर विजयी होण्याची शक्यता आहे. तर शाहीन बागेच्या मुद्द्यावरून आक्रमक प्रचार करणाऱ्या भाजपला अवघ्या ७ जागाच जिंकता येतील. त्यामुळे प्रचारावेळी भाजप बहुमताने सत्तेत येईल, असे दावे करणारे भाजप नेते चांगलेच तोंडघशी पडले आहेत. 

दिल्ली भाजपचे अध्यक्ष मनोज तिवारी यांनीही 'आप'ची सत्ता येईल, असे सांगणाऱ्या एक्झिट पोल्सचे दावे फेटाळून लावले होते. ११ फेब्रुवारीला सर्व एक्झिट पोल्स खोटे ठरतील. भाजप ४८ पेक्षा जास्त जागा जिंकून दिल्लीत सरकार स्थापन करेल. तुम्ही माझे ट्विट सेव्ह करून ठेवा, असे तिवारी यांनी म्हटले होते. 

'सगळे एक्झिट पोल खोटे ठरतील; दिल्लीत भाजपचीच सत्ता येईल'

मात्र, आज निकाल आल्यानंतर मनोज तिवारी चांगलेच तोंडघशी पडले. मात्र, पराभव होऊनही मनोज तिवारी यांनी दिल्लीत भाजपची ताकद वाढल्याचा दावा केला आहे. आम्ही या निवडणुकीत चांगली कामगिरी करू शकलो नाही. आम्ही याचे मूल्यमापन करू. अनेकदा आपल्या मनासारखे निकाल न लागल्यास आपण निराश होतो. मात्र, मी भाजपच्या कार्यकर्त्यांना इतकेच सांगेन की, तुम्ही हताश होऊ नका. २०१५ च्या तुलनेत आपल्या विजयी जागांची संख्या वाढली आहे, असे मनोज तिवारी यांनी सांगितले. 

दिल्लीत काँग्रेसची नाचक्की, निवडणुकीत ६७ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त

२०१५ च्या निवडणुकीत भाजपला अवघ्या तीन जागा मिळाल्या होत्या. मात्र, एक्झिट पोल्सनी यंदा भाजपच्या जागा २६ पर्यंत वाढतील, असा अंदाज वर्तवला होता. परंतु, आज प्रत्यक्ष निकाल समोर आल्यानंतर भाजपला अवघ्या ६ जागा मिळतील, असे दिसत आहे. मात्र, मनोज तिवारी यांना आपल्या जागा दुप्पट झाल्याचाच अधिक आनंद होताना दिसत आहे.