राहुल गांधींनंतर वायपेयींच्या भेटीसाठी भाजप नेत्यांची धाव

पंतप्रधान मोदी, अमित शहा वाजपेयींच्या भेटीला

Updated: Jun 11, 2018, 07:58 PM IST

नवी दिल्ली : माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींना दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. रुग्णालयात दाखल केल्यानंतर सगळ्य़ात आधी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी त्यांना भेटण्यासाठी गेले आणि त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. यानंतर मात्र भाजप नेत्यांची एम्स रुग्णालयाकडे धाव घेतली. भाजपचे अध्यक्ष अमित शहा हे वाजपेयींना भेटण्यासाठी एम्स रुग्णालयात पोहोचत आहे. त्यानंतर पंतप्रधान मोदी देखील काही वेळात रुग्णालयात पोहोचणार आहेत. आरोग्य मंत्री जेपी नड्डा हे देखील अमित शहा यांच्यासोबत वाजपेयींच्या भेटीसाठी रुग्णालयात पोहोचत आहेत.

वाजपेयींची नियमित तपासणी असल्याची माहिती एम्स रुग्णालयानं दिली आहे. मात्र तरीही वाजपेयी पुढील काही काळ निरीक्षणाखाली राहणार असल्याचं एम्सचे संचालक डॉक्टर रणदीप गुलेरिया यांनी सांगितलं आहे. दरम्यान वाजपेयींची भेट घेण्यासाठी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी एम्स रुग्णालयात गेले. यावेळी राहुल गांधी यांनी वाजपेयींच्या प्रकृतीची विचारपूस केली. राहुल गांधींच्या भेटीनंतर लगेचच भाजप नेत्यांची रुग्णालयाकडे धाव दिसत आहे.