निवडणुकीच्या प्रचारासाठी भाजपकडून काँग्रेसच्या दुप्पट हेलिकॉप्टर्सची बुकिंग

निवडणुकीच्या इतिहासात राजकीय पक्षांनी प्रथमच इतक्या मोठ्या संख्येने विमाने भाड्यावर घेतली आहेत.

Updated: Apr 3, 2019, 12:20 PM IST
निवडणुकीच्या प्रचारासाठी भाजपकडून काँग्रेसच्या दुप्पट हेलिकॉप्टर्सची बुकिंग title=

नवी दिल्ली: आगामी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पक्षाच्या स्टार प्रचारकांना वेगाने विविध राज्यांमध्ये दौरे करता यावेत, यासाठी सर्व राजकीय पक्षांनी हेलिकॉप्टर्स भाड्याने घेतली आहे. मात्र, या आकडेवारीवर नजर टाकल्यास भाजपने याबाबतीतही विरोधकांपेक्षा आघाडी घेतल्याचे चित्र आहे. भाजपने काँग्रेसच्या दुप्पट म्हणजे तब्बल ३२ विमानांचा ताफा दिमतीला ठेवला आहे. काँग्रेस पक्ष याबाबतीत दुसऱ्या स्थानावर आहे. 'इकॉनॉमिक टाईम्स'च्या माहितीनुसार, भाजपकडे असणाऱ्या एकूण ३२ विमानांमध्ये २० हेलिकॉप्टर्स आणि १२ जेट विमानांचा समावेश आहे. तर काँग्रेसकडे १० हेलिकॉप्टर्स आणि ४ बिझनेस जेटस असल्याचे समजते. 

या सगळ्यासाठी भाजपने सढळ हस्ते खर्च केला आहे. भाजपच्या ताफ्यात Cessna Citation XLS ही बिझनेस जेटस आहेत. या विमानांचे एका तासाचे भाडे २,८०,००० इतके आहे. याशिवाय, फाल्कन ४००० या विमानासाठी भाजप पत्र प्रतितास ४ लाख रुपये मोजत आहे. तर भाजपच्या ताफ्यातील २० हेलिकॉप्टर्समध्ये Bell 412, Agusta 109, Agusta 139 यांचा समावेश आहे. या हेलिकॉप्टर्सचे भाडे १,८०,००० ते ४ लाख रुपयांच्या घरात आहे. 

तर दुसरीकडे काँग्रेसच्या ताफ्यातही दोन Cessna Citation XLS 2 आणि एका फाल्कन ४००० विमानाचा समावेश आहे. याशिवाय, Bell 407 आणि Eurocopter D3 ही हेलिकॉप्टर्सही काँग्रेस नेत्यांच्या दिमतीला आहेत. 

आतापर्यंत निवडणुकीच्या इतिहासात राजकीय पक्षांनी प्रथमच इतक्या मोठ्या संख्येने विमाने भाड्यावर घेतली आहेत. मात्र, या वाढत्या मागणीमुळे विमानांच्या भाड्यावर कोणताही परिणाम झालेला नाही. त्यामुळे तेलुगू देसम आणि तेलंगणा राष्ट्र समिती यासारख्या प्रादेशिक पक्षांनाही फाल्कन ४००० आणि हेलिकॉप्टर्स भाड्याने घेणे शक्य झाले आहे.