MHADA Lottery : मुंबईत हक्काचं आणि स्वत:च्या कमाईतून घेतलेलं, स्वत:चं म्हणता येईल असं घर असावं ही अनेकांचीच इच्छा असते. हे स्वप्न साकार करण्यासाठी मदत होते ती म्हणजे म्हाडाची. महाराष्ट्र गृहनिर्माण क्षेत्र विकास प्राधिकरण (म्हाडा) च्या वतीनं आजवर मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये विविध भूखंडांवर गृहसंकुलं उभारत नागरिकांच्या घरांची गरत पूर्ण करण्यात आली. यंदाच्या वर्षीसुद्धा अवघ्या काही दिवसांतच म्हाडाली सोडत जाहीर होणार आहे. विजेत्यांच्या नावांची यादी या सोडतीमध्ये जारी केली जाणार असली तरीही काहीशी चिंता वाढवणारी बाबही नुकतीच समोर आली आहे. (Mumbai MHADA Lottery)
आगामी विधानसभा निवडणुकांच्या धर्तीवर आचारसंहिता लागू होण्याआधीच म्हाडाची सोडत जाहीर करत इच्छुकांचे अर्ज मागवण्यात आले होते. म्हाडाकडून काही त्रुटींमुळं आता सोडतीमध्ये विजयी ठरलेल्यांना काही अडचणींचा सामना करावा लागणार आहे, कारण सोडतीमध्ये नाव निवडून आलं तरी विजेत्यांना घराचा ताबा मिळण्यासाठी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे.
यापूर्वीच्या सोडतीमध्ये म्हाडानं तयार स्थितीतील घरं सोडतीमध्ये समाविष्ट करून घेतली होती. ज्यामुळं विजेत्यांची नावं जाहीर होताच सदर व्यक्तींकडे घरांचा ताबा सुपूर्द करण्यात येऊ शकेल. दरम्यान 8 ऑक्टोबरला प्रसिद्ध केल्या जाणाऱ्या म्हाडाच्या सोडतीमध्ये समाविष्ट करण्यात आलेली घरं अद्यापही पूर्ण झालेली नाहीत. तर, काही इमारतींना ऑक्यूपेंसी सर्टिफिकेट (ओसी) मिळालेलं नाही ज्यामुळं घरांचं पजेशन लांबणीवर पडणार हे स्पष्ट होत आहे.
म्हाडाच्या या सोडतीमध्ये यंदा 2030 घरांची जाहिरात करण्यात सआली. ज्यापैकी 1500 घरं अद्यापही पूर्णपणे तयार नसल्याचं सांगितलं जात आहे, त्यामुळं विजेत्यांना घराची चावी मिळण्यासाठी आणखी काही वेळ प्रतीक्षा करावी लागणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार म्हाडाच्या या सोडतीला इच्छुकांनी कमाल प्रतिसाद दिल्याचं पाहायला मिळालं. 2030 घरांसाठी म्हाडाचे तब्बल 1.13 लाख अर्ज करण्यात आले होते. त्यामुळं आता यातून कोणाच्या नावे घराची मालकी जाते हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
म्हाडानं मागील काही वर्षांमध्ये जारी केलेल्या सोडतींमध्ये काही विजेत्यांना घराचा ताबा मिळवण्यासाठी बरेच प्रयत्न करावे लागले होते. यामुळंच म्हाडालाही टीकेचं धनी व्हावं लागलं होतं, ज्यानंतर म्हाडानं OC असणाऱ्याच घरांचा समावेश सोडतीमध्ये करण्याचा निर्णय घेतला होता. पण, यंदा आगामी निवडणुकांच्या धामधुमीमुळं मतदारांना आकर्षित करण्याच्या हेतूनं सत्ताधाऱ्यांकडू सोडत प्रक्रियाही निर्धारित वेळेआधीच जाहीर करण्यात आल्याचं म्हटलं गेलं. म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी गोपनीयतेच्या अटीवर दिलेल्या माहितीनुसार सोडतीतील ज्या घरांचं काम अद्यापही अपूर्ण आहे, त्या सर्व घरांची कामं येत्या काही महिन्यांमध्ये पूर्ण होणार असून विजेत्यांना फार प्रतीक्षा करावी लागणार नाही. त्यामुळं आता घराची चावी कधी हातात येते, याचीच प्रतीक्षा काही विजेत्यांना असेल असं म्हणणं गैर ठरणार नाही.